बिग न्यूज: गुरुनगर येथे भीषण आग, दुकान व गोडावून जळून खाक

मध्यरात्रीची घटना, तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील गुरुनगर येथील एका किराणा दुकानाला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचा किराणा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.

गुरुनगर येथील विराणी टॉकीज ते काळे हॉस्पिटल रोडवर राजू भोंगळे यांच्या घराजवळ संजय माथनकर यांचे जय गुरुदेव ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान व हल्दिरामच्या नमकीनची एजन्सी आहे. तळ मजल्यावर दुकान तर वरच्या माळ्यावर गोडावून आहे. रात्री 2.00 वाजताच्या सुमारास या दुकानाला आग लागली. अर्ध्यातासानंतर परिसरातील काही लोकांना या दुकानातून आगीचे लोळ येत असताना दिसले. त्यामुळे लोकांनी याची माहिती त्वरित दुकान मालक व फायर ब्रिगेडला दिली.

आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडचे जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर 5.30 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली. या आगीत दुकानातील संपूर्ण किराना माल व हल्दिरामचे वेफर्स व इतर नकमिनेचे पॉकेट्स जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान देविदास जाधव, शाम तांबे, दीपक वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

मध्यरात्रीची घटना असली तरी आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी परिसरातील अनेकांनी गर्दी केली होती. भीषण आग लागण्याची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी मोठी घटना आहे. काही दिवसांपू्र्वी आबड भवन येथे भीषण आग लागली होती. 

 

हे देखील वाचा:

ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू

अल्पवयीन विद्यार्थिनी आठ दिवसांपासून बेपत्ता

Comments are closed.