अल्पवयीन विद्यार्थिनी आठ दिवसांपासून बेपत्ता

फुस लावून पळवून नेल्याचा संशय, आठ दिवसांपासून पोलीसांचे हातावर हात ?

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एका नामांकित महाविद्यालयात 11 व्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी गेल्या आठ दिवसांपासून घरुन बेपत्ता आहे. बेपत्ता मुलीच्या वडिलांनी 6 मे रोजी वणी पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. फिर्यादीने संशयित व्यक्तीबाबतही पोलिसांना कल्पना दिली. मात्र या गंभीर प्रकरणाची तपास करण्याची जाग वणी पोलिसांना आठ दिवसानंतर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार जत्रा मैदान भागात वास्तव्यास असलेले फिर्यादी याना 4 मुली आहे. 5 मे रोजी रात्री सर्व कुटुंबीय जेवण करून झोपले होते. 6 मे रोजी सकाळी 6 वाजता त्यांना दुसऱ्या नंबरची मुलगी घरात दिसून आली नाही. तेव्हा आई, वडील व बहिणीने आजूबाजूला शोध घेतले असता मिळून आली नाही. त्यानंतर नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. मात्र मुलीचा पत्ता लागला नाही. तिच्या मोबाईलवर कॉल करुन बघितले असता मोबाईल स्विचऑफ दाखवात होता.

अखेर मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तसेच मुलीला पळवून नेणाऱ्या संशयित व्यक्तीबाबत पोलिसांना तोंडी कळविले. मुलगी घरुन निघाली तेव्हा निळ्या रंगाची जीन्स व लाल टीशर्ट तिच्या अंगावर असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच घरुन 2 हजार रुपये व कागदपत्रेही नेल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून 8 दिवस उलटले असता वणी पोलिसांनी पीडित वडिलांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. मुलगी बेपता असल्यामागे ज्या इसमावर फिर्यादी यांनी संशय व्यक्त केला त्या व्यक्तीला साधी विचारपूस पोलिसांनी केली नसल्याचा दावा फिर्यादी यांनी केला आहे.

Comments are closed.