सुशील ओझा, झरी: मणभर सुरूवात करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा कणभरापासून सुरू केलेले कार्य निश्चितच मणभर होत असते. याचा प्रत्यय घेत सतत नावीन्याचा ध्यास घेवून धडपडणारे सुनील वाटेकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा बुधवारी झाली. जि.प.उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा येथे अधिकारी, शिक्षक व पालक असा त्रिवेणी संगम साधून सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या त्रिवेणी सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून यवतमाळ डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता नितीन भालचक्र, झरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, केंद्रप्रमुख प्रकाश दिकोंडवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवाकरजी महाकुलकर व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक उपस्थित होते.
यासभेस मार्गदर्शन करताना कोरोना काळातील शिक्षण व पालकांची जबाबदारी याविषयी नितीन भालचक्र यांनी पालक मनाचा वेध घेतला. ग्रामीण भागांतील पालकांच्या कामाचा आवाका लक्षात घेत पाल्य हासुद्धा खूप मौल्यवान ठेवा आहे. याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांना कमीत कमी अर्धा तास तरी वेळ देणे गरजेचे आहे, हे समजावून सांगितले. पालकवर्गांना ते पटलेसुद्धा आणि त्यांनी सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला.
आपल्यावर दिलेली जबाबदारी १००℅ प्रामाणिकपणा राखून पार पाडणारे झरी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख प्रकाश दिकोंडवार यांनीसुद्धा दोन वर्षांत शाळेच्या पटसंख्येत झालेली लक्षणिय वाढ पालकांच्या लक्षात आणून दिली. 30 मे 2018 ला 57 विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळेची पटसंख्या आज रोजी 114 झाली. हे बघून त्यांनी संपूर्ण शिक्षकवृंदांचे भरभरून कौतुक केले. तसेच विद्यार्थी हितासाठी व शालेय प्रगतीसाठी मदत करण्याचे पालकांना आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी कोरोना सारख्या महामारीला संकट न मानता एक संधी म्हणून तिचा स्वीकार करावा असे सांगितले. पालक व शिक्षकांना लाखमोलाचे मार्गदर्शन केले. या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांना करावयाचे असणारे कार्य त्यांनी पालकांना बोलून दाखविले. पालक विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
इयत्ता सहावीतील उमलता कलाकार ध्रुप प्रवीण निखाडे याने मुक्त संवाद साधला. त्याच्या मूर्तीचे सर्वांनी भरभरून कौतुक केले. वरिष्ठांच्या संपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी शिक्षकवृंदाच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप निश्चितच प्रेरणा देऊन कार्य करण्याची उभारी देणारी ठरली.
सभेचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सुनील वाटेकर यांनी केले. मार्गदर्शकांचा परिचय हर्षदा चोपणे यांनी करून दिला. तर ऑनलाइन शिक्षण हा विषय बालाजी मुद्दमवार यांनी हाताळला. आभार प्रदर्शन नेहा गोखरे यांनी केले.