जितेंद्र कोठारी, वणी : निर्गुडा नदीत मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची घटना शुक्रवार 13 मे रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान उघडकीस आली. सुनील पारशिवे (45), रा. भोईपुरा वणी असे मृत इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मासेमारी करुन उदरनिर्वाह करणारा सुनील पारशिवे गुरुवारी दुपारी आपल्या दोन सोबतीसह मासोळी पकडायला वागदरा परिसरात निर्गुडा नदीकडे गेला होता. त्याचे सोबती मासोळ्या घेऊन सायंकाळी परत आले. मात्र अंधार होऊनही सुनील परत आला नाही. सकाळी नदी परिसरात शोधण्यासाठी कुटुंबीय गेले असता नदी काठावर एका झाडाखाली सुनीलचा मृतदेह आढळून आला.
घडलेल्या घटनेबाबत कुटुंबातील लोकांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह पोस्टमार्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. रुग्णालयात पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले. मृतक सुनीलच्या मागे पत्नी व एक मुलगी आहे. सुनीलच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतरच कळेल. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
