विदर्भा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला, ट्रकचालक बेपत्ता

नेरड जवळील घटना, वणी उपविभागात पावसाचा कहर

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-मुकुटबन मार्गावरील नेरडचा (पुरड) पूल पार करताना एक ट्रक नदीत कोसळला. शनिवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेत ट्रकचालक वाहून गेल्याची माहिती आहे. रमाकांत शात्रीकर (45) असे वाहून गेलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. ते मुळचे भद्रावती येथील रहिवासी असून ते सध्या वणीतील भोईपुरा येथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात.

शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ते मुकुटबन परिसरात असलेल्या एका कंपनीत ट्रक घेऊन जात होते. शनिवारी संध्याकाळपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला. रात्रीपण पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे विदर्भा नदीला पूर आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रमाकांत हे ट्रक घेऊन मुकुटबनच्या दिशेने जात होते. दरम्यान नेरड (पुरड) जवळील पुलावर अंदाज न आल्याने ट्रक पुलावरून कोसळला. या अपघातात ते नदीत वाहून गेले, अशी माहिती आहे.

सकाळी परिसरातील काही नागरिकांना नदीपात्रात ट्रक पडलेला आढळला. यावेळी बघ्यांची एकच गर्दी गोळा झाली होती. कंपनीच्या ट्रकवरून माहिती काढली असता सदर ट्रक हा रमाकांत चालवत असल्याचे समोर आले. घटनेची माहिती तात्काळ शिरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. अद्याप ट्रकचालकाचा पत्ता लागला नसल्याची माहिती शिरपूर पोलिसांनी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी उपविभागात पावसाचा कहर
शनिवारी संध्याकाळपासून वणी उपविभागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नाल्यांना पूर आला होता. यामुळे काही काळ वणी ते कायर व वणी ते घोन्सा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रात्री अनेक लोक मोहुर्ली येथील पुलावर पाणी असल्याने अडकले होते. पुरात वारगाव येथील एक गाय वाहून गेली. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मारेगाव तालुक्यातही पावसाचा कहर सुरुच होता. मारेगाव शहरात तीन घरे पडली. तर अनेक झाडं कोसळले. पावसामुळे कोसारा ते माढळी (वरोरा) हा रस्ता बंद झाला होता. मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. 

अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी

वाढदिवसाच्या दिवशीच विवाहित तरुणाची आत्महत्या

Comments are closed.