मारेगाव पूर अपडेट्स: नदीकाठावरील नागरिक रात्रभर दहशतीत
अनेक गावांना पुराचा वेढा, राळेगाव व झरी तालुक्यात होणारी वाहतूक विस्कळीत
भास्कर राऊत, मारेगाव: पावसाची संततधार व धरणाचे दरवाजे उघडल्याने संपूर्ण जिल्ह्यातीलच नदी काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. मारेगाव तालुक्यातही अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे. नदीकाठावरील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. त्यामुळे या गावातील नागरिकांची मंगळवारची रात्र दहशतीत गेली. कित्येक जण तर जिवाच्या एकांताने ओरडत होते. तर जवळपास सर्वच नागरिक आपले महत्वाचे सामान पॅक करण्याच्या गडबडीत होते. प्रशासनाकडून सुद्धा सहकार्य करण्यात येत होते.
वर्धा नदीकाठावर असलेल्या सावंगी, शिवणी, आपटी या तीन गावांना पुराने वेढा घातलेला होता. या गावांमध्ये आठ ते दहा फूट पाणी शिरले होते. त्यामुळे गावातील नागरिक रात्रभर दहशतीत होते. अनेकांची शेती या पावसात बुडाली. काहींचे घरात पाणी शिरले. अनेकांच्या जनावरांचे नुकसान झाले. अन्नधान्य यांचीही मोठया प्रमाणात नासाडी झाली.
काही नागरिक तर रात्री जीव मुठीत धरून असल्याचे चित्र होते. कुणी रडत होते. तर कोणी इकडेतीकडे मदतीसाठी धावपळत होते. मदतीसाठी जाणारे काही प्रसिद्धीसाठी फोटो काढून व्हायरल करत होते. पण खरी मदत मात्र कुठूनच मिळत नसल्याने अनेकजण हतबल झाल्यासारखे दिसून येत होते. ट़डरात्री सामान बांधत असताना विजेचा पत्ता नव्हता. त्यामुळे वीज मंडळावर अनेकजण आपला राग व्यक्त करीत होते. स्थानिक प्रशासन नावाला मदतीसाठी असल्याचा नागरिकांचा आरोप होत आहेत. चिंचमंडळ येथील कर्मवीर शाळेमध्येंही पाणी शिरलेले आहे. तसेच गाडेगाव, पार्डी, चनोडा मुकटा या गावालगत पाणी आलेले असल्याने येथील नागरिकांचाही जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.
नवरगाव धरण भरले, अनेक गावांचा संपर्क तुटला
दुसरीकडे नवरगाव येथील धरण पूर्णपणे भरलेले असल्यामुळे तेथून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. त्यामुळे नवरगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने नवरगाव वरून जाणारी झरी तालुक्यातील वाहतूक तसेच म्हैसदोडका, सगणापूर, रायपूर येथील वाहतूकसूद्धा काही काळ बंद पडलेली होती. प्रशासन अलर्ट जरी असले तरी पाहिजे तशी मदत प्रशासनाकडून मिळत नसल्याचा अनेक नागरिकांनी आरोप केलेला आहे.
अलिकडच्या काळातील सर्वात मोठा पूर?
तालुक्यामध्ये मागील 15 दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरु आहे. मागील 25 वर्षामध्ये एवढा पूर आम्ही कधीच पाहिलेला नाही असे नागरिक सांगताना दिसत आहे. जुनमध्ये कोरडे गेलेले नक्षत्र या महिन्यात धो धो बरसत आहे. जुलै महीन्यातच पूर्ण वर्षाचा सरासरी पाऊस पडला. जलसाठे भरले. नदी ओसंडून वाहू लागल्या. तालुक्यामधून वर्धा नदी, निर्गुडा नदी तसेच अनेक छोटे मोठे नाले वाहत असतात. या सततच्या पावसाने या सर्व नदी आणि नाल्याना मोठया प्रमाणात पूर आलेला आहे. या पुरामुळे चंद्रपूर तसेच इतर गावांना जाणारे सर्व मार्ग बंद पडले होते.
Comments are closed.