पूर अपडेट: वणी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

युद्धपातळीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली... उद्या सर्व शाळा महाविद्यालय राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी: धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वणी तालुक्यातील वर्धा व पैनगंगा नदीकाठावरील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात पूर परिस्थिती बघता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने युद्धपातळीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलीआहे. पाण्याने वेढा घातलेल्या गावातील नागरिकांना मागणीप्रमाणे खाद्य सामुग्री व औषध पुरवठा करण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. तर काही ठिकाणी पूर प्रभावित गावातून नागरिकांना बोटीद्वारे स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती ही आहे. दरम्यान पूर परिस्थिती बघात उद्या मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळा व कॉलेज बंद राहणार आहे. तर पाटाळ्याचा पूल पाण्याखाली गेल्याने दुपारपासून वणी वरोरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा व लोअर वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला व नवरगाव धरणातून सोमवारी मोठ्या प्रमाणात वर्धा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा नदी काठावरील झोला, कोना, सावर्ला, शेलु(बु.), रांगणा गावात नदीचे पाणी घुसले आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे पैनगंगा नदी प्रवाहात दाब निर्माण होऊन वडा, जुगाद, सावंगी (जुनी), सावंगी (नवीन), मुंगोली, माथोली, चिंचोली, जुनाड, कोलगाव या गावांना पाण्याने वेढा घातला आहे.

वणी तालुक्यात पूर परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय उद्या 19 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. वणी वरोरा मार्गावरील पाटाळा येथील पुलावरून 8 ते 10 फूट पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील आज दुपारी 1 वाजतापासून वाहतूक ठप्प झाली आहे. तालुका प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चारगाव ते कोरपना वाहतूक विस्कळीत
शिरपूर जवळील वारगाव फाट्याजवळ कंटेनर घेऊन जाणारे वाहन व कोळसा घेऊन जाणारा ट्रक फसल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कंटेनर घेऊन जाणारे वाहन खड्यात गेल्याने कंटेनर घसरले. दरम्यान कोळसा घेऊन जाणा-या एका ट्रकने वाहन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकही खड्ड्यात फसला. दोन्ही वाहने फसल्याने शिरपूर ते चारगाव वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या या मार्गावरून फक्त दुचाकीची वाहतूक सुरू आहे. आज कंटेनर हटवण्यात येणार नसल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा: 

वणी-वरोरा मार्ग बंद, पाटाळ्याचा पूल पाण्याखाली

Comments are closed.