निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये आज मंगळवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय फुलबॉल सामन्यांचे सेमीफायनल आणि त्यातून ठरणा-या विजेत्यांमध्ये फायनल सामना रंगणार आहे. सध्या औरंगाबाद, दारव्हा, यवतमाळ आणि वणी हे संघ सेमिफायनलमध्ये पोहोचले आहेत. दुपारी 4 वाजता दारव्हा आणि वणी तर संध्याकाळी 6 वाजता औरंगाबाद आणि यवतमाळ यासंघात सेमिफायनल होणार आहे. या दोन्ही सामन्यातील विजेत्या संघामध्ये संध्याकाळी 8 वाजता अंतिम सामना रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या तुर्नामेंटसाठी परदेशातूनही काही खेळाडू आले आहेत. नायजेरियन खेळाडू हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
वणीमध्ये दिनांक 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान 7 ए साईड राज्यस्तरीय फुलबॉल टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने डे-नाईट आहे. वणीतील शासकीय मैदानावर युवा फुटबॉल स्पोर्टिंग असोसिएशनद्वारा या राज्यस्तरीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यभरातील 24 संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले परदेशी खेळाडू सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. वणीकरांचाही या तुर्नामेंटला एक प्रेक्षक म्हणून मिळालेला प्रतिसाद वाखाण्याजोगा आहे. खुल्या सामन्यासह याच मैदानावर 14 वर्षांखालील कुमारांच्या तुर्नामेंटचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचे फायनलही आजच होणार आहे.
या तुर्नामेंटमध्ये बक्षिसांची चांगलीच लयलूट आहे. पहिलं बक्षीस 30 हजार रुपये व ट्रॉफी वै. रुधाजी देरकर यांच्या स्मृती पित्यर्थ ठेवण्यात आले आहे. दुसरे बक्षिस 20 हजार रुपये व ट्रॉफी आहे. हे बक्षीस आशिष खुलसंगे, मतिनभाई व गुलाबराव आवारी यांच्यातर्फे देण्यात येत आहे. तर तिसरे बक्षिस 10 हजार रुपये रोख हे वणीतील माजी फुटबॉल खेळाडू हरिभाऊ पांडे यांच्यातर्फे देण्यात येत आहे. यासोबतच विविध वैयक्तिक बक्षीसांचीही मोठी लयलूट आहे.
फुटबॉल जरी आपल्या मातीतला नसला तरी खास मातीशी नातं सांगणारा हा खेळ आहे. आधी वणी हे फुलबॉलचं एक नावाजलेलं केंद्र होतं पण काही वर्षांपूर्वी हा खेळ वणीतून हद्दपार झाला होता. मात्र काही तरुणांनी पुढे येऊऩ गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वणीमध्ये पुन्हा हा खेळ सुरू केला. नवीन खेळाडू तयार केलेत. खेळाला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली. वणीतील काही खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचले आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात राज्यभरातील नामवंत खेळाडू वणीत आले आहेत. ही वणीकरांसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल. वणीमध्ये फुटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी व सेमिफायनल आणि फायनल सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.