वणीत रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन

शीतल साठे, सचिन माळी यांचा नवयान जलसा प्रमुख आकर्षण

0 684

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये शुक्रवार व शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी व 8 फेब्रुवारी रोजी रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सुप्रसिद्ध शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांचा नवयान जलसा हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. हे कार्यक्रम कल्याण मंडपम वणी व गव्हर्नमेंट हायस्कुलचे मैदान वणी येथे घेण्यात येणार आहे. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील कल्याण मंडपम येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या ऍड वैशाली टोंगे कवाडे (चंद्रपूर) असणार आहे. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेमचंद अंबादे, चांदूर रेल्वे व सानिया डोंगरे, भंडारा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर वैशाली टोंगे यांचे ‘क्रांतीच्या नायिका रमाई, सावित्री, जिजाऊ आणि आजची स्त्री’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर प्रेमानंद अंबादे यांचे ‘भगवान बुद्ध व सामाजिक समतेचा संदेश’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोनिया डोंगरे यांचे ‘आंबेडकरी चळवळीतील स्त्रींयांचे योगदान’ या विषयावर समारोपीय व्य़ाख्यान होणार आहे.

शीतल साठे व सचिन माळी यांचा नवयान महाजलसा

शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता गव्हरमेंट हायस्कूलच्या प्रांगणात सुप्रसिद्ध शाहीर शीतल साठे आणि विद्रोही कवी सचिन माळी यांच्या नवयान महाजलस्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवशीय महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Loading...