भंडारा जिल्ह्यातील गोतस्कर वणीत, चौघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: भंडारा जिल्ह्यातून वणीत येऊन गोवंशाची तस्करी करणा-या चौघांच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास झोला फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 6 बैलांची सुटका केली असून सुमारे सव्वा 11 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी वणी पोलिसांना खबरीद्वारा रात्री गोवंशाची तस्करी होण्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास झोला फाटा वरोरा रोड येथे सापळा रचला. दरम्यान बोलेरो पिकअप (MH34 BG4064) व (MH-36 AA 0972) हे दोन वाहणे त्यांना येताना आढळले. वाहनांना थांबवले असता त्यात बैल आढळून आले.

आतमध्ये बैलांना यातना होईल व हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत बांधण्यात आले होते. तसेच त्यांना पुरेसे अन्न पाणी याची कोणती व्यवस्था न करता वाहतूक करताना आढळले. पोलिसांनी याबाबत चालकाकडे विचारणा केली असता त्यांना समर्पक उत्तरे देता आली नाही. त्यावरून पोलिसांनी चार आरोपी व सहा बैल ताब्यात घेतले.

या प्रकरणी सचिन धनराज वैद्य वय 32 वर्ष रा. अभ्यंकर वार्ड, आकोट तालुका पवनी जि. भंडारा, अमोल दिनेश्वर घुमे वय 23 वर्ष रा. आंबेडकर वार्ड, पवनी जि. भंडारा, राजहंस आत्माराम नागपुरे वय 41 रा. नेहरू वार्ड, पोस्ट चिंचाळ ता. पवनी जि. भंडारा व गणेश किरण शेलोकर वय 20 रा. नेहरू वार्ड, चिंचाळा ता. पवनी जि. भंडारा यांच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम चे कलम 11(1),(D)11(1)(e),11(1)(h) नुसार गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी सहा बैल एकूण किंमत अंदाजे एक लाख वीस हजार व दोन पिकअप वाहने किंमत अंदाजे 10 लाख असा एकूण 11, 20,000 रु. चा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात वणी पोलिसांनी केली.

Comments are closed.