चौदावी न करता 150 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
वणीच्या मंथनवार परिवाराचा स्तुत्य उपक्रम
जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सगळीकडे लॉक डाऊन आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तळ हातावर पोट असणाऱ्या परिवाराची स्थिती यामुळे हलाखीची झाली आहे. अनेक परिवार उद्याची चूल पेटणार की नाही या विवनचनेने ग्रासले आहे.
सामाजिक दायित्व म्हणून वणीचे मंथनवार कुटुंब अशा काही गरजु परिवाराच्या मदतीला धावून आले. या परिवाराने 150 गरजू परिवाराना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. विशेष म्हणजे नंदा मंथनवार यांच्या चौदाविचा कार्यक्रम रद्द करून त्या ऐवजी या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
माजी गटविकास अधिकारी व वणीच्या जिल्हापरिषद कॉलनीत राहणाऱ्या रमेश मंथनवार यांच्या पत्नी नंदा मंथनवार यांचे गत सात मार्च 2020 रोजी निधन झाले. नंदा मंथनवार ह्या जिल्हापरिषद शाळेतून मुख्यध्यपिका म्हणून एक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण मंथनवार परिवार खरे म्हणजे सध्या शोकाकुल अवस्थेत आहे.
लॉक डाऊनमुळे त्यांना नंदा मंथनवार याच्या चौदाविचा कार्यक्रम करता आला नाही. रमेश मंथनवार यांचा मुलगा स्वप्नील, स्नुषा अस्विनी, जावई समीर गादेवार व वैभव कवरासे आणि मुली प्राजक्ता ,श्रुतिका , तेजश्री व नातू आराध्य व श्रीहान यांनी आपल्या आईची चौदावी न करता लॉक डाऊन मुळे प्रभावित झालेल्या गरजू परिवाराना मदत करण्याचा विचार मांडला. हा स्तुत्य विचार रमेश मंथनवार याना सुद्धा भावला.
रमेश मंथनवार यांनी वणीचे तहसीलदार शाम धनमने यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर येथील 100 गरजू परिवाराना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप केले. वणीच्या महसूल प्रशासनाने पुन्हा विनंती केल्यावरून वणी शहरातील गौरकार ले आऊट तसेच दीप्ती टॉकीज मागील झोपडीपट्टी परिसरात 50 गरजू परिवाराना मंथनवार परिवाराने जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
या वितरनाच्या नियोजनासाठी निवासी नायब तहसीलदार विवेक पांडे, मंडळ अधिकारी जयंत झाडे, तलाठी रघुनाथ कांडारकर , जिल्हा परिषद सदस्य संगदीप भगत ,साई मंदिर संस्थान राजूरचे अध्यक्ष कन्हैया कल्पूलवार, सचिव संजय पिसे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अस्लम, प्रदीप सूनकुरवर, दिलीप टेंभुर्डे, संदीप दासरवार, संतोष शिद्धमशेट्टीवार यांनी सहकार्य केले.