अन् निकाताचे झाले सत्तार खाँ वडील… केले कन्यादान…

आई वडिल नसलेल्या निकिता आणि अमोलच्या लग्नाची अनोखी गोष्ट

0

निकेश जिलठे, वणी: घरात अठराविश्व दारिद्र… तिच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला… घरून आई निघून गेली ती पुन्हा कधी परत आलीच नाही… मात्र दरवेळी रक्ताचे नातेच घट्ट असते असे नाही… मानलेल्या नात्याची विणही तेवढीच घट्ट असते हे दिसून आले मारेगाव येथील एका लग्नातून… या लग्नात पुढाकार घेतला तो सत्तार खाँ यांनी…. ते मुलीचे वडील झाले… आणि त्यांनीच तिचे कन्यादान केले… ही एका लग्नाची गोष्ट आहे.मारेगावातील निकिता आणि वणीच्या अमोलची… रविवारी 12 एप्रिलला मारेगाव येथील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात त्यांचा दोघांचा विवाह सोहळा पार पडला.. हे लग्न सध्या धार्मिक एकतेचं प्रतिक बनलं आहे.

वणी येथील टिळक चौकात सत्तार खाँ इब्राहिम खाँ यांचा फुल विक्रीचा व्यवसाय आहे. एकता नगरमध्ये ते राहतात. वणीकर त्यांना फुलवाले मामू नावाने ओळखतात. प्रेमळ स्वभाव आणि कायम मदतीला धावून जाण्याच्या सवयीमुळे सत्तारमामू यांचा जनसंपर्कही तेवढाच आहे. वणी येथील तेली फैल येथे अमोल बावने हा सव्वीस वर्षीय तरुण राहतो. मोल मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतो. व्यवसायामुळे अमोल बावने यांची सत्तार मामूंशी ओळख झाली. पुढे हे सबंध आणखीनच दृढ झाले. अमोल तरुण होताच अमोलच्या लग्नाची गोष्ट सुरू झाली.

मारेगाव येथे निकिता प्रवीण सेलोटकर ही 19 वर्षीय तरुणी राहते. लहान असतानाच तिचे वडील वारले. वडीलाचे निधन होताच तिची आई नोकरीचे कारण सांगून यवतमाळला निघून गेली. मात्र पुढे ती कधी घरी परत आलीच नाही. निकिता पोरकी झाली. ती म्हाता-या आजी आजोबाकडे राहू लागली. तिचा मामा हा एका हॉटेलमध्ये काम करतो. त्यावरच त्यांचे घर कसेबसे चालते.

दोन महिन्याआधी अमोलला एका संबंधीतांकडून निकिताचे स्थळ आले. मुलगी अत्यंत गरीब घरची आहे मात्र सुस्वभावी आहे अशी माहिती त्यांना दिली गेली. अमोल सत्तार भाईंना घेऊन मुलगी बघायला गेले. मुलाला मुलगी पसंत आली. मुलीलाही मुलगा पसंत पडला. आठ दिवसांनी मुलाने होकार कळवला आणि उन्हाळ्यात लग्न करण्याचे ठरले.

अन् सुरु झाले लॉकडाऊन….
इकडे लग्नाच्या गोष्टी सुरू असतानाच लॉकडाऊन सुरू झाले. हॉटेल बंद झाल्याने मामाचा रोजगारही गेली. शेवटी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाल्यावर लग्नाची गोष्ट तर दूरच. लग्नाची जबाबदारी मुलींकडे असल्याने भाचीचे लग्न कसे लावावे हा प्रश्न मामाला पडला. लग्नात घेण्या देण्याचा काही विषयच नव्हता. ना मुलीकडली तशी काही परिस्थिती होती. लग्न लावण्याची कोणताही ऐपत नसल्याने अखेर लग्नाचा विषय थांबवण्याचे ठरले.

अखेर सत्तार मामूने मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे मुलीकडल्या मंडळींना एक आधार मिळाला. मुलगी आणि तिच्या घरच्या व्यक्तींच्या कपडा लत्त्याची, साज शृंगाराची तसेच रितीरिवाजानुसार जो ही खर्च येईल तो सर्व खर्च करण्याचे ठरल्याने. अखेर 12 एप्रिलला रविवारी एखाद्या मंदिरात अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय झाला.

रविवारी मारेगाव येथील माधव नगरीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात लग्न करण्याचे ठरले. लॉकडाऊनमुळे मुलीचे आजी आजोबा आणि मामा तर मुलाकडून मुलाचे आईवडील आणि सत्तार मामू व त्यांच्या पत्नी उमराव बेगम या होत्या. मुलीचा साज शृंगार, कपडे लत्ते याचा सर्व खर्च सत्तार मामू यांनी उचलला.

हिंदू रितीरिवाजा प्रमाणे लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. कोरोनामुळे मास्क लाऊन मंगलाष्टक आणि फेरे झाले. जेव्हा कन्यादान करण्याची वेळी आली तेव्हा कन्यादान करण्यासाठी सत्तार मामू पुढे आले. त्यांनी मुलीचे वडील होत कन्यादान केले. नवविवाहित दाम्पत्याने उपस्थितांचा आशीर्वाद घेतला.

ठाणेदारांचा घेतला नवदाम्पत्यांनी आशीर्वाद
लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्याने पोलीस ठाणे गाठले. तोपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. सत्तारमामूंचे सर्वत्र कौतुक होत होते. नवविवाहितांनी त्यांच्या लग्नाची सर्व कहाणी ठाणेदार वैभव जाधव यांना कथन केली. त्यांनी सत्तार मामू यांचे कौतुक करत नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिला.

निकिताच्या रुपात मला मुलगी मिळाली – सत्तार खाँ
निकिता आता माझी मुलगी आहे. तिची सर्व जबाबदारी आजपासून मी उचलली आहे. पुढे ही मुलीच्या लग्नानंतर एका बापाला जे कर्तव्य पार पाडायचे असते ते मी आनंदाने पार पाडेन. निकिता व्यतिरिक्त आणखी दुस-या कुण्या व्यक्तीला माझी गरज भासल्यास त्यांच्यासाठीही मी धावून जाईन.

सध्या वणी आणि परिसरात हे लग्न कौतुकाचा विषय झाला आहे. जात धर्मापलिकडे विचार करत एका आई वडिल नसलेल्या मुलीचे पालकत्व स्वीकारल्याने सत्तार मामू यांचे कौतूक होत आहे. तसेच मुलीच्या घरची परिस्थिती लक्षात घेऊन अमोल यांने जी सामंजस्याची भूमिका घेतली त्याचे ही कौतुक होत आहे. या कार्यात सामाजिक कार्यकर्ता शाहिद खान आणि इमरान खान यांनी ही सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.