ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार

गुरुवारी संध्याकाळी वणीत येणार पार्थिव, संध्याकाळी वणीकरांना घेता येणार अंत्यदर्शन

जितेंद्र कोठारी, वणी: लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच शुक्रवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांचे मुळ गाव मुर्धोनी येथील सामुदायीक प्रांगणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून विमानाने नागपूर विमानतळावर पोहचणार  आहे. विमानतळावरच कामठी मिलिट्री बेस तर्फे त्यांना मानवंदना दिली जाईल. त्यानंतर लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव रात्री  वणी येथे येणार असल्याची माहिती आहे.

वणीकरांना संध्याकाळी घेता येणार अंत्यदर्शन
ले. क. वासूदेव यांचे पार्थिव वणीत आल्यानंतर वणी येथे स्टेट बँक समोरील त्यांच्या निवासस्थानी 2 तास वणीकरांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. रात्री उशिरा यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव वणी तालुक्यातील मुर्धोनी येथे नेण्यात येणार आहे. शुक्रवार 7 ऑक्टो. रोजी सकाळी 10.30 वाजता मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शहीद लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या अंत्यसंस्काराला खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले व इतर गणमान्य नागरिक उपस्थित राहणार आहे.

लेफ्टनंट कर्नल वासूदेव दामोदर आवारी हे 170 फिल्ड रेजिमेंट (वीर राजपूर) मध्ये कर्तव्यावर होते. नुकतेच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती मिळाली होती. ते अरुणाचल प्रदेश येथील भारत-चीन बॉर्डरवर समुद्रतळावरून 16 हजार फूट उंचीवर (high altitude) कर्तव्य बजावत होते. मंगळवारी दुपारी कर्तव्य बजावताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ गुवाहाटीतील 151 मिलीट्री बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

असा होता जीवप्रवास…
मुळचे मुर्धोनी येथील रहिवासी असलेले व सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. दामोदर आवारी यांचे वासूदेव हे धाकटे पुत्र होते. आवारी कुटुंबाची शहरात एक सुपरिचित व प्रतिष्ठीत कुटुंब म्हणून ओळख आहे. कुटुंबातील किमान एक व्यक्ती देशसेवा, एक व्यक्ती वारकरी संप्रदाय, आरोग्य सेवा अशी सेवाभावी परंपरा या कुटुंबाची आहे. लेफ्टनंट कर्नल वासूदेव यांनी आपले शालेय शिक्षण विवेकानंद विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी NDA येथे प्रवेश घेतला. NDA तून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आर्मीत लेफ्टनंट या पदावर रूजू झाले. त्यानंतर ते मेजर या पदावर पोहोचले. काही महिन्याआधीच त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती मिळाली होती.

भेटीचे वचन राहिले अपूर्ण….
लेफ्टनंट कर्नल वासूदेव हे सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू झाले असले तरी परिसराशी त्यांची नाळ जुळलेली होती. ते कायम परिसरातील तरुणांच्या संपर्कात असायचे. NDA, सैन्य भरती, पोलीस भरती इत्यादींची तयारी करणा-या तरुणांना ते वणीत आले की मार्गदर्शन करायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही ते लोकप्रिय होते. दिवाळीत ते वणीत येणार होते. अनेकांशी भेटण्याचे त्यांनी वचन दिले होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.