दीर्घ कालावधीनंतर मारेगाव तालुक्यात पुन्हा आत्महत्या

ऐन सणाच्या दिवशी कुटुबींयांच्या नकळत प्राशन केले कीटकनाशक

भास्कर राऊत, मारेगाव: काही दिवस खंड पडलेल्या मारेगाव तालुक्यात ऐन सणाच्या दिवशी आत्महत्येची घटना घडली. म्हैसदोडका येथील एका 60 वर्षीय महिलेने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सर्वत्र दसरा व विजयादशमी उत्सवाची धामधूम सुरु होती. अशातच म्हैसदोडका येथील लता मनोहर डाहुले वय अंदाजे 60 वर्ष या आपल्या कुटुंबियांसमवेत घरीच होत्या. परंतु त्यांच्या मनात विचारांचे काहूर चाललेले होते. त्यांनी घरच्या व्यक्तींच्या नकळत घरी फवारणीसाठी आणून ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले. कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना याबद्दल काहीच सांगितले नाही.

काही वेळानंतर त्यांना ओका-या सुरू झाल्या. त्यांच्या प्रकृतीमध्ये होत असलेला बदल घरच्यांच्या लक्षात आला. त्यांनी लताबाईला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही. एक ते दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पतीला पॅरालिसिस झाला होता. त्यामुळे शेती त्यांची दोन्ही मुले संभाळीत होती. मृतक लता यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंड असा आप्तपरीवार आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार

आजपर्यंतची सर्वात जम्बो ऑफर: आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू

Comments are closed.