विश्वसनीयता हा पत्रकारितेचा कणा – गजानन कासावार

नगर वाचनालयात 'माझं गाव - माझा वक्ता' व्याख्यानमालेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : लोकशाहीच्या चार स्तंभापैकी पत्रकारिता हा चवथा आणि खंबीर स्तंभ आहे. लोकशाहीच्या इतर तीन स्तंभांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्य हा चवथा स्तंभ करतो. मात्र निस्पृहरीत्या केवळ सत्य प्रतिपादन पत्रकारिता करुनच लोकशाहीला जिवंत ठेवता येते. मिशन म्हणून सुरू झालले पत्रकारिताचे क्षेत्र हल्ली कमिशनच्या विळख्यात अडकल्याचे चित्र दिसत आहे. बातमी मध्ये ‘बात’ कमी आणि ‘मी’ अधिक असणे हे आजकालचे दुर्दैव आहे. असे विचार वरिष्ठ पत्रकार गजानन कासावार यांनी व्यक्त केले

विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित माझं गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यान मालिकेत माझी पत्रकारिता या विषयावर ते व्यक्त होत होते. राज्य शासन उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच पत्रकारितेतील बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित गजानन कासावार यांनी तरुण भारतासारख्या दर्जेदार वृत्तपत्रात काम करताना मला शुचिता पाळता आली हे माझे भाग्य असल्याचे प्रतिपादित केले.

अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानात गजानन कासावार यांनी पत्रकारितेचा इतिहास उलगडून दाखवत नवनवीन माध्यमांच्या काळातदेखील पत्रकारितेची विश्वसनीयता त्यांनी अधोरेखित केली. बातमी म्हणजे केवळ घटनेचे वर्णन नसून त्यामागील विश्लेषण आणि त्यातून सकारात्मक परिणाम मांडण्याची भूमिका किती आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी कोण? कुठे? काय ? का ?केव्हा? कसे? या सहा ककारांच्या आधारे वार्ता संकलन आणि सादरीकरण कसे असावे याचे त्यांनी सुंदर विश्लेषण केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ.दिलीप अलोणे यांनी तथ्य समोर आणणे आणि जनप्रबोधन हे पत्रकारितेचे आधारस्तंभ असायला हवेत हे सांगत रचनात्मक, सृजनशील कार्यापेक्षा उथळ उच्छृंखल बातम्या देण्यात पत्रकार स्वारस्य दाखवत असल्याची खंत बोलून दाखवली. यावेळी संस्कृत भारतीद्वारे निर्माण करण्यात आलेल्या गीता अभ्यास वर्गाचे तीन खंड संस्कृत भारतीच्या शिक्षा विभाग प्रमुख प्रा. प्रणिता भाकरे यांनी ग्रंथालयाला समर्पित केले.

व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे तसेच नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार उपस्थित होते. प्रास्ताविकात माधव सरपटवार यांनी व्याख्यान मालिकेची भूमिका विशद केली तर कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.सा.संघ वणी चे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ सदस्य अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार आणि प्रमोद लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.