विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने 21 जून रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणीतील तेली फैल येथे जुगार अड्यावर धाड टाकून 8 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीमध्ये एक नगरसेवक असल्याने चर्चेला चांगलेच पेव फुटले आहे.
21 जून रविवारी यवतमाळ येथिल स्थानिक गुन्हे शाखेला वणीतील तेली फैल येथे जुगार सुरू असल्याची महिती मिळाली. माहितीवरून पोऊनि श्रीकांत जिदमवार, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, निखिल मडसे यांनी घटनास्थळी धाड टाकली.
या ठिकाणी नगरसेवक प्रशांत उर्फ छोटू निमकर, माजी नगरसेवक विनोद निमकर, वसंत पाटील, नागेश रंगुरवार, विलास निमकर, मनोज चांदेकर, विष्णू कदम सचिन देशपांडे या आठ जणांना अटक केली. हे सर्व जण पैसे लावून जुगार खेळताना आढळले.
यांच्याकडून नगदी स्वरूपात 44 हजार रुपये तर 1 लाख 61 हजारांचे मोबाईल असा एकूण 2 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यांच्यावर कलम 269, 188, 4 व 5 नुसार गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे भाजपचा नगरसेवक प्रशांत उर्फ छोटू निमकर याला लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती. याबाबत त्याला पक्षातून निलंबीतही करण्यात आले होते.