वणीत वाजत गाजत बाप्पाला निरोप

शांततेत आणि भक्तीमय वातावरणात विसर्जन पार

0

विवेक तोटेवार, वणी: मुक्त गुलालाची उधळण, ढोल ताशांचा निनाद, तर कुठे टाळ मृदंगाचा गजर यात लाडक्या बाप्पाला वणीकरांनी निरोप दिला. कोणतीही अनुचित प्रकार न घडता शांततेमध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नगर पालिकेने विसर्जनासाठी चोख व्यवस्था केल्याने आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे विसर्जनाचे कार्य निर्विघ्ण पार पडले.

वणी शहरात रविवारी आणि सोमवारी गणपती विसर्जन करण्यात आले. रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व घरगुती गणेशाचे विसर्जन झाले. वणी शहरात 30 मोठे सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती. यात 18 सार्वजनिक मंडळाच्या गणपतिचे विसर्जन रविवारी कऱण्यात आले होते. तर उर्वरित 12 सार्वजनिक मंडळाच्या गणपतिचे विसर्जन सोमवारी करण्यात आले.

गणेश विसर्जनानिमित्त पोलिसांनी दिवसरात्र बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली. टागोर चौकातून सर्व सार्वजनिक गणेश मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी जात होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इथे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कऱण्यात आली होती.

विसर्जनाच्या वेळी कोणताही गोंधळ उडू नये तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी नगरपालिकेने यावर्षी विशेष व्यवस्था केली. प्रत्येक घाटावर विसर्जन कुंड आणि निर्माल्य कलश बसवण्यात आला होता. तसेच विसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नगरपालिकेतर्फे कऱण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.