ना ढोल-ताशा, ना मिरवणूक… तरीही गणरायाला उत्साहात निरोप

सार्वजनिक व घरगुती गणपती प्रतिमाचे विसर्जन, नगराध्यक्षांनी केले 3 हजार मास्क वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला… एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला या जयघोषात लाडक्या बाप्पाला वणीत निरोप देण्यात आला. शहरातील तब्बल 2 हजार घरगुती गणपतीची प्रतिमाचे विसर्जन रविवार 19 सप्टेंबर रोजी करण्यात आले. तर घरगुती गणेशासह, सार्वजनिक गणेश मंडळाने स्थापन केलेल्या 29 प्रतिमेचे विसर्जन सोमवार 20 सप्टेंबर रोजी येथील निर्गुडा नदीच्या घाटावर करण्यात आले. याशिवाय अनेक भाविकांनी आपल्या घराच्या प्रांगणात टब व प्लास्टिक ड्रममध्ये बाप्पाचे विसर्जन करण्यास पसंती दिली. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे ढोलताशे, डीजे जरी नसला तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम होता.

पर्यावरणपूरक गणपती विसर्जनकरीता नगर परिषद वणी तर्फे निर्गुडा नदी घाटावर निर्माल्य संकलन कुंड तसेच प्रतिमेच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले. गणपती विसर्जन उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे संपन्न होणेकरिता नगरपरिषद, पोलीस प्रशासन व रोटरी क्लब तर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती.

विसर्जन स्थळावर वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी स्वतः भाविकांना मास्क वाटप करून कोरोना नियम पाळण्याची विनंती केली. यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते तब्बल 3 हजार मास्क वाटप करण्यात आले. नदी प्रवाहात विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसह, स्थानिक गोताखोरांची तैनाती करण्यात आली होती.

घरीच टबमध्ये बाप्पांचे विसर्जन
गेल्या काही वर्षांपासून घरीच टबमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. काहींनी याला सुरूवात देखील केली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून प्लास्टिक टब किंवा ड्रमचे कुंडमध्ये विसर्जन करण्याच्या प्रमाणात अचानक वाढ झाली. या वर्षी घरीच ड्रममध्ये किंवा टबमध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढले असल्याचे दिसून आले. मूर्तीचे घरीच पर्यावरणपूरक विसर्जनामुळे नदीच्या पाण्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत तर झाली, शिवाय नदी घाटावर भाविकांची गर्दीही कमी झाली.

फोटो साभार – शेखर वांढरे

प्रशासनाने यंदा प्लॅस्टर ऑफ पेरीसच्या मूर्ती विक्रीवर बंदी घातली होती. त्यामुळे बहुतांश भाविकांनी मातीने तयार करण्यात आलेली गणेश मूर्ती बसविण्यास प्राधान्य दिले होते.

हे देखील वाचा:

वीज अभियंतासोबत हुज्जत, टायर व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वणीतून दुचाकी चोरून नेणा-याला अटक

Comments are closed.