वीज अभियंतासोबत हुज्जत, टायर व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वीज बिल थकीत असल्यामुळे कापले वीज कनेक्शन

जितेंद्र कोठारी, वणी: वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून शहरातील सुपरिचित व्यावसायिक राज जयस्वाल यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन अधिका-यांशी हुज्जत घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. कुटुंब प्रमुख घरी नसताना वीज पुरवठा कापल्याने जयस्वाल यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन अधिका-यांशी हुज्जत घातली व शिविगाळ केली असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी राज जयस्वाल यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राजेश बालाजी जिझिलवार हे महावितरण (एमएसईबी) विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वीज पुरवठा सुरू ठेवणे, वीज बिल वसूल करणे, वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीसाठी 14 कर्मचारी आहेत. वणीतील सुपरिचित व्यावसायिक राज जयस्वाल यांचे वरोरा रोडवर तारा टायर्स नावाने एमआरएफ टायचे शोरूम आहे. ते बन्सल ले आऊट येथे राहतात. यांच्यावर 15878 रुपयांची महावितरणची विजेच्या बिलाची थकबाकी आहे.

20 सप्टेंबर रोजी महावितरणचे काही कर्मचारी त्यांच्या घरी बिलाची वसुली करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी सध्या राज जयस्वाल हे घरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे कर्मचारी त्यांच्या दुकानात गेले. त्यावर राज जयस्वाल यांनी तुमच्या साहेबांना पाठवा असा निरोप कर्मचा-यांना दिला. दुपारी 4.30 वाजता जिझिलवार हे चार कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बन्सल ले आऊट येथील प्रवीण जसवंत जैन यांच्या नावाने वीज कनेक्शन असलेल्या घरी गेले. यांच्याच घरी राज जयस्वाल राहतात.

तिथे जिझिलवार यांनी दोन महिन्यांचे बिल थकीत असल्याचे सांगितले. त्यांच्या मुलाने वडील घरी नसल्याचे महावितरणच्या पथकाला सांगितले. यावर जिझिलवार यांनी वीज पुरवठा खंडित केला व ते कॉटन मार्केट जवळील त्यांच्या कार्यालयात परत आले. कुटुंब प्रमुख घरी नसताना वीज पुरवठा कापल्याने राज जयस्वाल संतप्त झाले. ते 5.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या मित्रांना घेऊन महावितरणच्या कार्यालयात आले. कार्यालयात वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला व प्रकरण शिविगाळीवर गेले. या वादात राज यांनी जिझिलवार यांचा हात मुरगळला. याआधीही वीज बिलावरून राज यांनी वाद घालून धमकी दिल्याचा जिझिलवार यांचा आरोप आहे.

झालेल्या प्रकरणानंतर जिझिलवार यांनी कर्मचा-यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले. तिथे त्यांनी कर्तव्यार असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व अधिका-यांविरोधात हुज्जत घालणे व शिविगाळ करणे याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात राज नंदलाल जयस्वाल यांच्यावर कलम 354, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोहेकॉ अनंता इरपाते करीत आहे.

नोटीस न देताच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत ?
कोरोना काळात अनेकांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना मात्र महावितरण अधिकारी दंडुकशाही वापरून वीज बिल वसुली करीत असल्याचा सर्वसामान्यांचा आरोप आहे. कोरोनाचा आधार घेऊन महावितरण गेल्या काही महिन्यांपासून मीटर रिडींग न घेता सरासरी युनिटचे बिल देत आहे. तसेच खासगी कंपन्या व शासकीय कार्यालयावर लाखों रुपयांची वीज थकबाकी असताना त्यांच्यावर कारवाई न करता सर्वसामान्यांना त्रास देतात असाही आरोप महावितरणवर होत आहे. तसेच वीज खंडीत करण्यासाठी आधी नोटीस देणे गरजेचे असताना हा नियमही पाळला जात नाही अशी सर्वसामान्यांची तक्रार आहे.

हे देखील वाचा:

वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

वणीतून दुचाकी चोरून नेणा-याला अटक

 

Comments are closed.