सुशील ओझा, झरी: तालुक्यातील तरुण अल्पवयीन व शालेय विद्यार्थी नशेकरिता पुढे गेलेत. त्यांना गांजा किंवा अन्य मादक पदार्थांचा पुरवठा कुठून होतोय? हे शोधून काढणे हे पोलिसांपुढील आव्हानच आहे. ह्या मादक पदार्थांमुळे शेकडो तरुणांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे पालकांत दहशत पसरली आहे.
आपण कोणत्या मार्गावर जात आहोत याचे भान मुलांना नाही. नशेकरिता तरुणांनी वेगवेगळे शोध लावले आहेत. गांज्या, अफीम या मादक पदार्थ नशेकरिता वापरतात. तालुक्यात या दोन मादक पदार्थांव्यतिरिक्त खोकल्याकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधीचा वापर सर्रास नशेकरिता होत आहे. दोन वर्षांपूर्वी तर काही तरुणांनी नशेकरिता आयोडेक्सचा वापर करीत होते.
ब्रेडला लावून आयोडेक्स खात होते. नशेकरिता बॅटरी (टॉर्च) मध्ये वापरणारे सेल फोडून त्यातील पांढऱ्या कलरचा पावडर (एसिड सारखा) काढून एक ग्लास पाण्यात टाकून पाणी गाळून पिऊन नशा करीत आहे. परंतु आजची तरुण व अल्पवयीन परिसरातील शालेय विद्यार्थी गांजा व अफीमच्या नशेत गुरफटले असून ते आपल्या जीवनाशी खेळत आहे .
मुकुटबन परिसरातील जंगल, लेआऊट, सायंकाळला बी. एस. एन. एल.च्या टॉवरजवळ, वणी मुकुटबन ते पाटण मुख्य मार्गाच्या आडोश्यात, पिंपरड रोडवरील रेल्वे पुलाजवळ, हिवरदरा गावाच्या टेकडीजवळ, रात्रीच्या वेळेस रस्त्यावर तर काही चौकातसुद्धा गांजाची चिलम घेऊन बिनधास्त गांजा ओढतात.
कधी पार्टीमध्ये गांजाचा वापर होत आहे. तर कधीकधी तर भर रस्त्यावर चारचाकी थांबवून गाणे वाजवत नाचत चिलमने दम मारत असल्याची माहिती हाती लागली आहे. मुकुटबन येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरातील जंगलालगत चार युवक गांजा चिलीमने फुंकत असताना आढळलेत. पोलिसांना पाहून दुचाकी सोडून पळून गेलेत. अल्पवयीन शाळकरी मुलेसुद्धा यात गुंतली असल्याची माहिती आहे.
शालेय विद्यार्थी आपल्या पाल्यांना अंधारात ठेवून हे नशेचे कृत्य करीत असून आपले पुढील भविष्य अंधकारमय करीत आहेत. याबाबत पोलिसांना माहिती असूनसुद्धा अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही न करता झोपेचे सोंग घेऊन आहेत. तालुक्यात अल्पवयीन मुले दारूच्या व्यसनात असताना आता नवीन अजून गांजा फुंकण्याचे संकट उभे झाले आहे. तालुक्यात गांजा कनेक्शन थेट वणी व कायर येथून असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. काही तरुण या कार्याला अंजाम देत आहेत.
या नशेच्या आहारी विद्यार्थी व तरुण असल्याची कुणकुण पोलीस व काही शिक्षकांसह गावकऱ्यांनासुद्धा असून सर्वच गप्प बसले आहेत. नशा करण्याकरिता पैसा न मिळाल्यास हेच तरुण गुन्हेगारीकडे वळणार अशीही चर्चा सुरू आहे. तालुक्यात गांजा व मादक पदार्थ इतर कोणत्याही नशेच्या वस्तू आणून विक्री करणाऱ्याचा शोध घेणे एक आवाहन आहे. शालेय विद्यार्थी तसेच युवकांच्या जीवनाशी खेळणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कार्यवाहीची मागणी होत आहे. मुकुटबन, अडेगाव व परिसरात शेकडो तरुण नशेच्या आहारी गेले आहेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)