गरबा-दांडिया नसला तरीही, यंदा…….

गरबा, दांडियावर बंदी; पण उत्साह कायम

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवरात्रात ‘ढोली तारो’ सारख्या अनेक गीतांवर थिरकणारे पाय थांबलेत. यंदा गरबा किंवा दांडिया डान्स नाही. नवरात्रीच्या रात्री आता सुनसान असतील. तरीदेखील काहींचा उत्साह कमी झालेला नाही. पाय थिरकले नाहीत, तरी मनातील तरंग लहरत्याच आहेत.

गरबा, दांडिया खेळण्याची परंपरा ही खूप जुनी आहे. कथांनुसार भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपगड्यांसह खेळत असं मानतात.गुजराथमधून आलेला हा लोककलाप्रकार आता संपूर्ण जगात खेळतात. यंदा गरब्याला ढोल वाजणार नाहीत. पाय थिरकणार नाहीत. तरीही आतील उत्साह यंदा कमी होणार नसल्याचं गरबाप्रेमी म्हणतात.

दांडिया, गरबा हे समूहनृत्य आनंदाच्या प्रसंगांना गुजराथेत करतात. नवरात्रात याचा विशेष जल्लोष असतो. दांडिया हा शब्द दांडी अर्थात काठीवरून आला असावा. फूट-दीड फुटांच्या काठीला रंगीत कापड, कागद किंवा रंगांनी सजवतात. हे नृत्य वर्तृळाकार चालते.

फेर धरून नाच केला जातो. शक्यतो यात जोड्या असतात. या नृत्याचा स्पेशल ड्रेस असतो. लाल आणि अनेक आकर्षक भडक रंग यात असतात. टिकल्या, आरसे, परावर्तन करण्याऱ्या वस्तू यात असतात. पुरुषांच्या डोक्यावर पगडी किंवा पागोटे असते. गुजराथच्या बडोदा, अहमदाबाद, सुरत अशा शहरांवरून दांडियाचा पॅटर्न फेमस झाला आहे.

गरबा म्हणजे काय

गुजराथेत नवरात्रीला घटस्थापना होते. खूप छिद्रे असलेले मातीचे हा घडा असतो. यात चांदीचा क्वॉईन ठेवतात. त्यावर दिवा लावतात. नवरात्रात हा दिवा अखंड राहिला पाहिजे याची काळजी घेतात. या मातीच्या भांड्याला ‘गरबी’ म्हणतात. या गरबीची पूजा करतात. यावेळी जे नृत्य केलं जातं, त्याला गरबीवरून गरबा म्हणतात. एरवी नवरात्रांत नव देवींची पूजा, उपासना, आराधना केली जाते. गुजराथेत पहिले तीन दिवस दुर्गा, नंतर तीन दिवस लक्ष्मी आणि अंतिम तीन दिवसांत सरस्वतीची आराधना होते.

म्युझिकल गरबा

नो म्युझिक, नो गरबा इतकं सोपं हे गणित आहे. तालवादक प्रा. अजय महल्ले यांनी गरबा ठेका यावेळी वापरतात असं सांगितलं. गरब्यात रिदमला खूप महत्त्व असतं. ठेका पकडून पदन्यास करावा लागतो. गरबा म्युझिकमधील काही इंटरनॅशनल स्टार आहेत. इस्माईल दरबार, फाल्गुनी पाठक, पार्थीव गोहील, सोली कनादिया अशी काही नावं घेता येतील.

पूर्वी पारंपरिक वाद्य वापरली जायची. आता त्यासोबतच ऑक्टोपॅड, कीबोर्ड, गीटार आदींचा समावेश आहे. गरबा उत्सवात ऑर्केस्ट्रा कलावंतांना रोजगार मिळतो. त्यांना कलांचा आनंद घेता आणि देता येतो. कोरोनामुळे सगळं काम ठप्प झालं.  

सचिन गुडे, सिंफनी म्युझिकल ग्रुप

.

एकोप्याचा सोहळा गरबा

यंदा दहा दिवसांचा माहोल राहणार नाही. भक्ती आणि कलांचा संगम म्हणजे गरबा होय. या निमित्तानं अनेक परिचित, अपरिचित एकत्र येतात. स्नेह वाढतो. कोरोनामुळे यावर्षी सर्वांचेच हात बांधलेत. नवरात्रीच्या आधी एक-दीड महिन्यापासूनच तयारी सुरू होते. ग्राउंड, डेकोरेशन यांचं प्लानिंग होतं. नवे आणि मुरलेले जुने कलावंत गरब्याच्या सरावाला लागतात. अनेक दिवस प्रॅक्टिस चालते. नवीनप्रयोग होतात. वणीत मंगलमूर्ती, जेसीआय हे सर्वांसाठी गरब्याचं आयोजन करतात. विविध बक्षिसांची लयलूट असते. गुजराथी समाज, मेवाडी समाज, पंजाबी समाज, सिंधी समाज हेदेखील त्यांच्या लेव्हलवर गरब्याचं आयोजन करतात. गुजराथचा प्रादेशिक गरबा नॅशनल झाल्याचा अनुभव घेता येतो.

मयूर गेडाम, आयोजन समिती, मंगलमूर्ती

 

गरबा जिव्हाळ्याचा भाग

गेल्या 7-8 वर्षांपासून जेसीआय वणी सिटीचा गरबा उत्सव सुरू आहे. नवरात्र आणि गरबा हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही नव्या पिढीचा उत्साह पाहण्यासारखा असतो. गरबा डान्सचे विविध प्रकार त्या निमित्ताने पाहावयास मिळतात. गुजराथी पारंपरिक गरब्यापेक्षा खूप वेगळ्या स्टेप्स असतात.
लोक या निमित्ताने आनंद घेतात. आनंद वाटतात. कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र येतात. हा आनंदाचा सोहळा आहे. यंदा कोरोनामुळे गरबा उत्सव घेता आला नाही. अनेक गरबाप्रेमींनी आम्हाला विचारपूस केली. पुढील वर्षी हा उत्सव निर्विघ्नपणे होईल. ही अपेक्षा करतो.

शहाबुद्दीन अजाणी, गरबा आयोजन समिती

 

आनंद कपाटात बंद करू नका

सोशल डिस्टंसिंग ही आजची गरज आहे. कोरोनाने संपूर्ण जग ग्रासलं आहे. त्यामुळे यंदा गरबा कुठेच नाही. एरवी नवरात्रीची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. गरब्याचे ठेवणीतले ड्रेसेस तसेच कपाटात पडून राहतील. आतील उत्साह मात्र कपाटात बंद करू नका. घरीच आपण देवीची आराधना करूयात.
गरबा म्हटलं की आनंद आणि उत्साह. अगदी वृद्धदेखील दुरून का होईना याचा आनंद घेतात. सर्वांनाच काही क्षण टेंशन दूर झाल्याचा अनुभव घेता येतो. हे कोरोनाचे संकट दूर व्हावे, ही जगदंबेचरणी प्रार्थना.

सुमित चोरडिया, दांडिया आयोजन समिती

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.