शिक्षण विभागाची गॅस सिलिंडर घेण्यासाठी अल्पशी मदत

0

वणी (रवि ढुमणे): नुकतेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मध्यांन्न भोजन शिजविण्यासाठी आवश्यक असलेल्या गॅस जोडणीसाठी अल्पशी मदत दिल्याचे समोर आले आहे. गॅस कनेक्शनसाठी मुख्याध्यापकांना अल्प आर्थिक मदत केल्याने मुख्याध्यापक अडचणीत आले आहेत. प्राप्त माहितीनुसार केवळ एक हजार आठशे रूपये देऊन गॅस कनेक्शन घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. ज्या शाळांनी हे कनेक्शन घेतले त्यातील एका शाळेत तर गॅसचा स्पोट झाल्याचे देखील समोर आले आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासनाने जिल्हा परिषद शाळेतील मध्यान्न भोजन शिजविण्यासाठी नुकतेच गॅस सिलींडर घेण्यासाठी मुख्याध्यापकांच्या शाळेतील बॅंक खात्यात एक हजार आठशे रूपये जमा केले. तसंच त्यांना गॅस सिलींडर घेण्यासंबधीच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुचना केल्या आहेत. यात पंचायत समितीने ठरविलेल्या गॅस एजन्सी कडूनच खरेदी करण्याचे सुध्दा सांगण्यात आल्याची माहिती आहे. किमान चार हजार रूपयाचे गॅस कनेक्शन केवळ एक हजार आठशे रूपये खात्यात देवून घ्यावयाचे असल्याने आता ते कोणते असेल याचाही अंदाज येतोच.

नुकतीच अशीच घटना घडली आहे. तालुक्यातील घोन्सा येथील जिल्हा परिषद शाळेत गॅस सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असल्याची माहीती मिळाली आहे. यासंबधी गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप काकडे यांनी संबधीत विभागातील व्यक्तीला फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनाच उलट सुलट बोलल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
येथील कर्मचारी राजकीय आश्रयात वावरत सामान्य लोकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. राजकीय पुढारी स्वतःचे हित जोपासत कर्मचार्यांना पाठबळ देत असल्याने असे प्रकार घडायला लागले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष पुरवून वेळीच दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच मुख्याध्यापकांना आता अनेक अडचणीचा सामना करावा लागणार हे सुध्दा तितकेच सत्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.