गीता जयंती निमित्त विशेष व्याख्यान
बहुगुणी डेस्क, वणी: “शरीर, मन आणि बुद्धी या तीन पातळ्यांवर आनंदी होऊ शकणाऱ्या मानवी जीवांसाठी अनुक्रमे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीन योग साधनांच्या द्वारे, ज्ञानाधिष्ठित, भक्तियुक्त, कर्मयोगाचा उपदेश करीत, मानवी जीवनाच्या सर्वोच्च आनंदाचा राजमार्ग भगवद्गीता प्रशस्त करते” असे निरूपण विद्यावाचस्पती प्रा .स्वानंद गजानन पुंड यांनी केले.
जैताई देवस्थान, नगरवाचनालय, संस्कृत भारती आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असणार्या संस्कृत साहित्य रसास्वाद व्याख्यानमालेच्या या महिन्याच्या विशेष सत्रात गीता जयंती निमित्ताने “गीता माहात्म्य” या विषयावर ते विवेचन करीत होते.
कार्यक्रमाच्या आरंभी वणीतील संस्कृत भारतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रणिता भाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माधवराव सरपटवार तथा प्रशांत भाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार घेण्यात आला. याचे संचालन कोमल बोबडे हिने केले. संस्कृत भारतीच्या बाल कार्यकर्त्यांनी व्याख्यानाच्या आरंभी भगवद्गीतेचा बाराव्या अध्यायाचे पठण केले.
जगाच्या पाठीवर जयंती साजरी होत असलेला श्रीमद्भगवत गीता हा एकमेव ग्रंथ आहे असे सांगत डॉ.स्वानंद पुंड यांनी अनेकानेक पैलूंच्या आधारे गीतेचे माहात्म्य विशद केले. कार्यक्रमाची सांगता रेणुका अणे यांनी गायलेल्या संस्कृत पसायदानाने झाली.