शिक्षकांना निरोप देताना अख्खं गाव अश्रूंनी भिजलं !

बंद होणाऱ्या शाळेची क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात भरारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: “इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड मिळाली, तर शून्यातूनही विश्व निर्माण करता येतं,” याचं जिवंत उदाहरण गोडगावच्या जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेत पाहायला मिळालं. शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र अशा सर्वच अंगाने गावाचं नाव उंचावणाऱ्या मुख्याध्यापक संतोष आसुटकर व सहाय्यक शिक्षक ईश्वर राऊत यांचा गावकऱ्यांनी भव्य निरोप समारंभ आयोजित केला. शिक्षकांच्या बदलीच्या दिवशी संपूर्ण गोडगाव वासीयांच्या डोळ्यांत अश्रू तराळले होते.

सन 2018 मध्ये गोडगावमध्ये केवळ पाच विद्यार्थ्यांची पटसंख्या असताना या शिक्षकांनी शाळेची जबाबदारी स्वीकारली. बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेली शाळा त्यांनी फक्त दोन दिवसांत गावसभेत ठराव करून 22 विद्यार्थी दाखल करून जिवंत केली. गावकऱ्यांच्या मदतीने रंगरंगोटी, बोलक्या भिंती, पिण्याचं पाणी, खेळसाहित्य, क्रीडा ड्रेस अशा सुविधा लोकवर्गणीतून उभारल्या. शैक्षणिक गुणवत्ता उंचावलीच, पण शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, इंग्रजी भाषण स्पर्धा यामध्येही मुलांनी यश संपादन केलं.

क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात शाळेची भरारी
लहान शाळा असूनही क्रीडा क्षेत्रात गोडगावने सलग दोन वर्ष केंद्रस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तालुका स्तरावर उपविजेतेपद मिळवलं. जिल्हास्तरीय खो-खो, योगासन, शो ड्रिल अशा स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक मिळवत विद्यार्थ्यांनी गावाचं नाव गगनभरारी घेतलं. विशेष म्हणजे मुलींच्या खो-खोमध्ये केवळ दहा मुलींनी सुवर्णपदक पटकावलं. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिक्षणाबरोबरच मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून भरघोस बक्षिसं मिळवली गेली आणि त्याच निधीतून शैक्षणिक सहलीही पार पडल्या. शाळेची पटसंख्या वाढत जाऊन आज ती 30 वर पोहोचली आहे.

परंतु 16 सप्टेंबर 2025 रोजी या दोन्ही शिक्षकांची बदली झाल्याने गावभर हळहळ पसरली. उघाडीचे दिवस असूनही सकाळी दहा वाजल्यापासून लहानथोर गावकरी शाळेत जमले. निरोपाच्या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं. आपले लाडके शिक्षक गाव सोडून जात आहेत, या भावनेने गावकऱ्यांचे हृदय भरून आलं.

शिक्षकांचा निरोप कायमस्वरूपी स्मरणात राहावा म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या हस्ते दोन वृक्षांची लागवड करून त्यांची जतन करण्याचं अभिवचन दिलं. एवढंच नव्हे, तर एका रात्रीत गावकऱ्यांनी 11 हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा करून निरोप समारंभ भव्यदिव्य केला.

गावाच्या मनात घर करणारे शिक्षक आता बदलीने गेले असले तरी त्यांचं कार्य, त्यांचं शिक्षणावरील प्रेम आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू, ही गोडगावच्या इतिहासातली अविस्मरणीय पानं ठरणार आहेत.

Comments are closed.