वणीकरांसाठी गूड न्यूज, 11 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह

आज आणखी 3 व्यक्ती कॉरेन्टाईन, 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी

0

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर आजचा दिवस वणीकरांसाठी ‘गूड न्यूज’ घेऊन आला. सुरुवातीला पाठवण्यात आलेल्या 15 हाय रिस्क स्वॅबपैकी 11 जणांचे रिपोर्ट आले असून हे 11 ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत घोषणा व्हायची असून विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. यामुळे वणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे मात्र अद्यापही वणीवरचे कोरोनाचे संकट कमी झाले नसून आणखी 48 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

(updated News: धक्कादायक… वणीत कोरोनाचे आणखी 2 रुग्ण)

धक्कादायक… वणीत कोरोनाचे आणखी 2 रुग्ण

सोमवारपर्यंत प्रशासनाने 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. तर आज मंगळवारी आणखी 16 जणांचे स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबची संख्या ही आज 59 झाली आहे. तर काल पर्यंत कॉरेन्टाईन करण्यात आलेल्यांची संख्या 56 होती यात आणखी तिघांची भर पडली असून आता कॉरेन्टाईन झालेल्यांची संख्या ही 59 झाली आहे. यातील काही व्यक्ती होम कॉरेन्टाईन असून उर्वरित व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

एस राजकुमार यांची वणीला भेट
वणीत कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जिल्हा पोलीस अधिक्षक एस राजकुमार यांनी वणीचा दौरा केला. पोलीस ठाण्यात भेट देत त्यांनी तिथे प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली. अधिका-यांकडून कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय त्यांनी वरोरा रोडवरील प्रतिबंधीत क्षेत्रास भेट देत या परिसराची पाहणी केली. प्रतिबंधीत क्षेत्र हे गजबजलेले नसले तरी इथे योग्य ती खबरदारी घ्यावी व इथे राहणा-या लोकांना आवश्यक त्या वस्तू व सेवासांठी कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याचेही आदेश दिले.

वॉट्सऍपवरची ‘ती’ पोस्ट केवळ अफवा…
आज सकाळपासून वॉट्सऍपवरून वणीमध्ये काही व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याची अफवा चांगलीच व्हायरल झाली. ‘वणी बहुगुणी’ने याबाबत फॅक्टचेक केले असता असे कोणतेही अपडेट नसून ही केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने याआधीही कोणत्याही अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. शिवाय वॉट्सऍपवरून अफवा पसरवणे हा गुन्हा असून अशा लोकांवर कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे अशा अफवांपासून सावध राहा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोविड केअर सेन्टरमध्ये सोयीसुविधा नसल्याची बातमी प्रकाशीत होताच प्रशासनाने तातडीने जाऊन त्याठिकाणी पाहणी केली. काल पासूनच सेन्टरची साफ सफाई कऱण्यास सुरूवात झाली. नगरपालिकेच्या कर्मचा-यासह अधिकारीही साफसफाईसाठी उतरले. या ठिकाणी जनरेटरचीही व्यवस्था नव्हती. आज तिथे जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती आहे.

अद्याप संकट टळले नाही…
आज वणीकरांचा दिवस चांगला असला तरी अद्याप 48 रिपोर्ट्स येणे बाकी आहे. मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, डबलसीट जाऊ नये, सॅनिटायजरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशआ सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहे. याशिवाय कोरोनाच्या काळात परिसरात अनेक अफवा, शंका याला पेव फुटले आहे. जे कुटुंब आणि व्यक्ती याच्या विळख्यात आले आहे. त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे असून एकमेकांना धीर देऊन, सांभाळून या संकटाशी लढावे. तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून संपूर्ण खबरदारी घ्यावी असे आवाहन परिसरातील सुजाण नागरिक व ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.