शासनाची गाईडलाईन पाळण्यात शासकीय कार्यालयच मागे
कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गाईडलाईनची पायमल्ली...
विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिक तसेच शासकीय कार्यालय यांना गाईडलाईन दिली आहे. मात्र इतरांना सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देणा-या शासकीय कार्यालयातच शासनाने दिलेल्या गाईडलाईनची पायमल्ली होताना दिसत असून ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ याची प्रचिती वणीकरांना येत आहे.
लॉकडाऊन 5.0 म्हणजेच अनलॉक 1.0 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने अनेक शिथीलता आणली आहे. मात्र सुरक्षे संबंधी ज्या गाईडलाईऩ होत्या त्या आधीसारख्याच आहेत. त्यात मास्कचा वापर करणे, जागा सॅनेटाईज करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, एकत्र जमू नये इ गोष्टींचा यात समावेश आहे. सध्या शासकीय कार्यालयाकडे आपत्ती व्यवस्थापनाचाही कार्यभार आहे. मात्र वणीतील शासकीय कार्यालयातच ही गाईडलाईन पायदळी तुडवली जात असल्याचे चित्र आहे.
काय आहे शासनाची गाईडलाईन?
यात कर्मचारी व कार्यालयात येणा-यांचे आधी थर्मल स्कॅनिंग करावे, कार्यालयातील सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात, सर्व कर्मचा-यांनी 3 पदरी मास्क घालावा, दोन कर्मचा-यांमध्ये 3 फुटांचं अंतर ठेवावे, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवावे, टेबल खुर्च्या, बटन, उपकरणे दिवसातून तीव वेळा सॅनिटाईज करावे, सफाई कर्मचा-यांना सुरक्षा उपकरणे पुरवावे, यासह एका वाहनातून अऩेक कर्मचा-यांनी प्रवास करू नये, ई-ऑफिसचा अधिकाधिक वापर करावा, कार्यालयीन बैठक ई कॉन्फरन्सद्वारा घ्यावी अशा अनेक गाईलाईन देण्यात आल्या आहेत. मात्र यातील अनेक गाईडलाईनचे पालन कार्यालयात होताना दिसत नाही.
शहरात संगल सिटपेक्षा ट्रिपल सिटच अधिक…
सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी बाईकने सिंगल सिट प्रवासास मुभा दिलेली आहे. मात्र शहरात सिंगल सिट फिरणारे कमी व त्याऐवजी डबल सिट व ट्रिपल सिट फिरणारेच अधिक असल्याचे चित्र आहे. मात्र अशा बाईकचालकांवर कोणतीही कार्यवाही प्रशासनातर्फे केली जात नाहीये. सुरुवातीला काही काही पोलीस प्रशासनाने अशा बाईकस्वारांवर कार्यवाही केली होती. मात्र आता अशा डबल व ट्रीपल सीटवर कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
सध्या सुदैवाने वणीमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र याची भीती अद्याप मिटलेली नाही. वणीत रोज हजारो लोक बाहेरगावाहून येजा करतात. त्यातील अनेक लोक केवळ कार्यालयीन कामासाठी तर इतर खरेदी व नोकरीनिमित्त येतात. मात्र याबाबत ना लोकांनी धास्ती घेतली आहे ना कार्यालयानी. चेह-यावर मास्क न लावता तसेच सोशल डिस्टन्सिंगची कोणतीही काळजी न घेता सध्या लोकांचा वावर सध्या सुरू आहे. त्यामुळे कार्यालयासह लोकांनीही शासनाने दिलेली गाईडलाईनचे पालन करणे गरजेचे आहे. अऩ्यथा अद्याप दूर असलेल्या वणी शहरात कोरोनाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही.