शासकीय मैदानावरील कार्यक्रमाविरोधात क्रीडाप्रेमी आक्रमक
मैदान वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
विवेक तोटेवार, वणी: येत्या नवरात्रीमध्ये दांडीयासाठी शासकीय मैदान एका संस्थेला देण्यात आल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर ही परवानगी रद्द केली गेली नाही तर मोठं आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून वणीत एका खासगी संस्थेेेचा नवरात्री दरम्यान दांडीयाचा कार्यक्रम चालतो. या कार्यक्रमासाठी तिकीट देखील असते. हा कार्यक्रम दर वेळी इतर खासगी ठिकाणी व्हायचा. मात्र यावेळी या दांडीयाला शासकीय मैदानावर परवानगी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमामुळे नऊ दिवस मैदानावरील सर्व कृती बंद होणार असल्याने या प्रकाराने क्रीडाप्रेमी, खेळाडू, योगाप्रेमी, तसेच फिरण्यासाठी जाणारे सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले आहेत.
वणीमध्ये सध्या एकच योग्य परिस्थितीतील शासकीय मैदान आहे. या मैदानावर क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉल, ऍथलॅटिक, योगा इत्यादी खेळ प्रकार चालतात. शिवाय यात सकाळी आणि संध्याकाळी फिरण्या-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच अनेक सार्वजनिक कार्यक्रम, मूर्त्यांची विक्री, विविध सण इत्यादी गोष्टींसाठी या मैदानाची परवानगी देण्यात येते. दरम्यान यामुळे दोन ते तीन दिवस मैदानावरील खेळ, सराव सर्व बंद होतात. त्यातच आता तब्बल नऊ दिवसांची परवानगी देण्यात आल्याने या सर्व खेळाविषयीच्या क्रिया थांबणार आहे. तसेच डिसेंबर महिन्यात पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन या परीक्षा आहेत. त्यामुळे त्यांचा सरावही थांबणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींंनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आधीच परिसरात कोणत्याही खेळाला प्रोत्साहन मिळत नाही. खेळाडुंना योग्य त्या सोयीसुविधा दिल्या जात नाही. तसेच गेल्या काही काळापासून तालुका क्रीडा अधिकारी नसल्याने परिसरातील क्रीडा प्रकाराचा ‘खेळ’ झाला आहे. खेळाडू स्वःखर्चाने तसेच आपसात वर्गणी गोळा करून इथे विविध खेळांचा सराव करतात. सोबतच इथे पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठीची शारीरिक तंदरुस्तीसाठी सराव करणा-यांची संख्या मोठी आहे.
दिनांक 11 सप्टेंबरला जेसीआय या एका खासगी संस्थेला नवरात्री दरम्यान दांडीया उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली. हा कार्यक्रम संपूर्णतः व्यावसायिक आहे. यासाठी तिकीट दरही आकारले जाते. यामुळे तब्बल नऊ ते दहा दिवस खेळाचा सराव करणे, फिरणे, योगा, इत्यादी गोष्टींमध्ये व्यत्यय येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला शासकीय मैदानात परवानगी देण्यात येऊ नये, तसेच या कार्यक्रमाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काही क्रीडाप्रेमी संघटनांनी केली आहे.
यासंदर्भात उद्या दिनांक 13 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा क्रीडा अधिकारी इत्यादींना निवेदन दिले जात आहे. तरी खेळात व्यत्यय आणणा-या या कृतीला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विविध संघटना आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी केली आहे. जर याकडेे दुर्लक्ष केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशाराही संघटनांनी दिला.