रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. उमेदवार निवडण्यासाठी राजकीय पक्ष तसेच गावपुढाऱ्यांनी फ़िल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. निवडणुका ७ ऑक्टोबरला होणार आहे. एकशे ६१ सदस्यासांठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तसेच सरपंच पदासाठी 13 हजार 249 पुरुष व 11 हजार 908 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
या निडणुकीत ७ सदस्य संख्या असलेल्या ९, ९ सदस्य असलेल्या ९ व १७ सदस्य असलेल्या सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सर्वात मोठी ग्रामपमचायत असलेल्या चिखलगावात ५ हजार तीनशे ८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याने या निवडणुकीत खरी चुरस येथेच बघायला मिळणार आहे.
निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला १५ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी व चिन्ह देण्यासाठी २७ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२सप्टेंबर तर अर्जाची छाननी २५ सप्टेंबर ला होणार आहे.
तालुक्यातील १९ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच गावागावात राजकीय ज्वर चांगलाच चढलेला असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी सरपंच पदाचा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे.
चिखलगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष
तालुक्याचे मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलगाव ग्रामपंचायत ही १३ सदस्य संख्येवरून १७ सदस्य संख्येवर पोहचली आहे. मागील गेल्या १५ वर्षांपासून एकहाती सत्ता प्रस्थापित करून चिखलगाव ग्राम पंचायत विकासाच्या दृष्टीने मॉडेल म्हणून ओळख देणारे सरपंच सुनील कातकडे यावेळी सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नात आहे. येथील सरपंच पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने ते आपल्या गटाचा उमेदवार उभा करणार आहे. गेल्या १५ वर्षात केलेला विकास हेच ब्रीद घेऊन ते मैदानात उतरणार आहे. मात्र प्रतिस्पर्धी असलेल्या केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे पदाधिकारी सध्यातरी उमेदवारांची जमवाजमव करताना दिसत आहे.
एकूणच राज्यात आणि केंद्रात तसेच पंस मध्ये सत्ता असताना देखील चिखलगाव ग्रामपंचायतीवर ताबा मिळविणे सत्ताधाऱ्यांना चांगलेच अवघड जाण्याची शक्यता आहे. सोबतच चिखलगावात तीन पॅनल होण्याची शक्यता बळावली आहे. या निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यामध्ये कही खुशी कही गम असे चित्र ही बघायला मिळते आहे. यासाठी आता गावागावात उमेदवार निवडीसाठी जोरदार फ़िल्डिंग सुरू झाली आहे.
तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका
पुरड(ने), कायर, रांगणा, वरझडी, ब्राम्हणी, अहेरी, गणेशपुर, चिखलगाव, मंदर, साखरा(दरा), कुरई, शिंदोला, कळमना(बु), चारगाव, वारगाव, केसुर्ली, मेंढोली, वेळाबाई, बोर्डा