कोण मारणार बाजी ? शिंदोल्यात ८७.४३ तर मेंढोलीत ८६.३१ टक्के मतदान

शिंदोला, मेंढोलीत सरपंच पदाची निवड अटीतटीची, उत्कंठा शिगेला

0

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यात शनिवारला १९ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. सकाळी आणि दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने मतदारात उत्कंठा दिसून आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. परिणामी मतदान शांतपणे पार पडले. वणी तालुक्यातील शिंदोला आणि मेंढोली गाव राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. यावेळी हुशार, होतकरू  तरूणांना थेट सरपंचपदासाठी उभे राहण्याची संधी उपलब्ध झाल्याने तरुणांत उत्साह होता.

शिंदोला ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक १ मध्ये ४६०  पैकी ४३४, वार्ड क्रमांक २ मध्ये ५१८ पैकी ४७७ तर वार्ड क्रमांक ३ मध्ये ४७९ पैकी ३६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १४५७ पैकी १२७४ मतदारांनी मतदान केले. मतदान ८७.४३ टक्के झाले. सरपंच पदासाठी विठ्ठल दसरू बोंडे व नंदू शिवशंकर गीरी यांच्यात अटीतटीची लढत दिसून आली. परंतु विजयाबद्दल उत्सकुता आहे.

मेंढोली येथील वार्ड क्रमांक १ मध्ये ४२८ पैकी ३५५, वार्ड क्रमांक २ मध्ये ५२७ पैकी ४५० तर वार्ड क्रमांक ३ मध्ये ५०६ पैकी ४५६ मतदारांनी मतदान केले. एकूण १४६१ पैकी १२६१ मतदारांनी मतदान केले. मतदान ८६.३१ टक्के झाले. सरपंचपदासाठी मनोज काळे, पवन एकरे, शत्रुघ्न दानव, प्रवीण एकरे उमेदवार होते. मात्र खरी लढत मनोज काळे आणि पवन एकरे यांच्यात झाल्याचे ऐकिवात आहे.

शिंदोला लगतच्या कळमना (बु.) येथे ६१३ पैकी ५१० मतदारांनी मतदान केले. एकूण ८३.०० टक्के मतदान झाले. सध्या ग्रामीण भागात सोयाबीन सांगवणी, कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने सकाळी व दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी होती.दुपारच्या दरम्यान शुकशुकाट होता. एक एक मतदार केंद्रावर पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.

पहिल्यांदाच सरपंच थेट जनतेतून निवडला जात असल्याने त्यासाठी स्वतंत्र मतपत्रिका होती. मतदारांना आपल्या वार्डातील सदस्यांच्या निवडीसह सरपंच पदाच्या उमेदवाराला स्वतंत्र मतदान करावे लागले. एकाच पॅनलच्या व एकाच वार्डातील उमेदवारांचे तसेच सरपंचाचे चिन्ह वेगवेगळे असल्याने निरक्षर मतदार गोंधळात पडले. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना थेट वाहनाने मतदानासाठी आणण्यात आले. मतदान केल्यानंतर परत पोचविण्यात आले. पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात उतरल्यामुळे मतदार त्यांना प्रतिसाद देतो की, नाही हे बघण्याची उत्सुकता जनतेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.