ग्रामपंचायत सचिवाने अफरातफर केल्याचा आरोप
उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सचिवाविरोधात तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपेल्ली ग्रामपंचायतीमध्ये अफरातफर झाल्याची तक्रार झाली. उपसरपंच व ग्रामपंचत सदस्य यांनी सचिव यांच्या विरोधात गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना तक्रार तशी दिली. ग्रामपंचायत सतपल्लीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी दि 29 सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांना सातपेल्ली ग्रामपंचायतीच्या सचिवांनी अफरातफर केल्याची तक्रार केली.
तक्रारीत सतपेल्ली येथे खाजगी डॉक्टरामार्फत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्या शिबिरात गावातील व बाहेरगावातील रुग्ण आले असता रुग्णांकडून डॉक्टरांची तपासणी शुल्क प्रत्येकी 500 रु घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.
तपासणीनंतरही प्रत्येक रुग्णाकडून औषधोपचारासाठीसुद्धा रक्कम घेण्यात आल्याचंही बोललं जातं. ग्रामपंचायत सचिवांनी एका संस्थेशी संगनमत करून शिबिरासाठी रक्कम देण्याचे ठरवले. ग्रामपंचायत सतपल्लीच्या सदस्यांनी संस्थेस रक्कम देण्यास विरोध केला. असे तक्रारीत म्हटले आहे.
तरीसुद्धा ग्रामपंचत सचिवांनी परस्पर रक्कम काढून संस्थेस दिली. या संबंधी ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांनी सचिव यांना विचारणा केली असता, मला गटविकास अधिकारी यांनी परवानगी दिली असे सचिव यांच्याकडून उत्तर आले. तसेच मंदिर रस्त्याच्या खडिकरणाकरिता ग्रामपंचायतीतर्फे सर्वानुमते मंजुरी दिली.
परंतु रक्कम काढण्यात येऊनही रस्त्याचे काम करण्यात आले नाही. असे वरीलप्रमाणे विविध आरोप झालेत. याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी. ग्रामपंचायतीला निधी परत मिळवून द्यावा अशी मागणी उपसरपंच हनमंतू बोलीवर, लीना चांदवार, गजानन राजरपावार, सुनील सिद्दमवार, मंगला मोहजे, शशिकला धोटे यांनी केली आहे
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)