शिवसैनिक असल्याचे सांगून वेगळी चूल मांडणारे शिवसैनिक कसे?

विश्वास नांदेकर यांचा सवाल, पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

0

नागेश रायपुरे, मारेगाव: एकीकडे शिवसैनिक असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्वत:च्याच पक्षाच्या विरोधात कृत्य करणे पक्षात खपवून घेतले जात नाही. सेना ही कडवट शिवसैनिकाच्या परिश्रमामुळे गावोगावी पोहोचली आहे. यात घराणेशाहीला थारा नाही. त्यामुळे कुणी घराणेशाही थाटण्यासाठी वेगळी राजकीय चूल मांडत असेल तर अशांविरोधात कार्यवाही केली जाईल असा इशारा शिवेसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी दिला आहे. मारेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नवीन पक्ष संघटनेबाबत भूमिका स्पष्ट केली.

मारेगाव तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी तालुका प्रमुख गजानन किन्हेकर यांनी नुकतेच पक्षात डावलल्याचा आरोप करत काही शिवसैनिकांना सोबत घेत वेगळी राजकीय संघटना स्थापन केली. याशिवाय स्वबळावर निवडणूक लढवण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. याबाबत आज गुरुवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी स्थानिक रेस्ट हाऊसमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी गजानन किन्हेकर यांच्यावर विश्वास नांदेकर यांनी हल्लाबोल केला. किन्हेकर हे घराणेशाहीचे राजकारण करत आहे. त्यामुळे सामान्य शिवसैनिक दुखवला जात आहे. पक्षात घराणेशाही चालू न देणे म्हणजे अन्याय नव्हे. पक्ष चालविताना मतं-मतांतरे असू शकतात. पण याचा अर्थ पक्षाला बाधा पोहोचवणे होत नाही. याबाबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करण्यात आली आहे. अशी माहिती नांदेकर यांनी दिली. तालुक्यात शिवसेना एकसंघ असून सर्व शिवसैनिक आमच्या सोबत आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले.

वेगळी चूल मांडणारे शिवसैनिक कसे?
पक्षात कोणालाही डावलण्यात येत नाही. ज्यांचा जो मान असतो तो पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार त्यांना मिळतोच. मी विचाराने शिवसैनिक आहे असे भावनिक आवाहन करून संघटना स्थापन करणारे खरच शिवसैनिक होवू शकतात का? असाही सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मारेगाव तालुका हा सेनेचा बालेकिल्ला आहे. इथे घराणेशाहीला थारा नाही. कुणी वेगळी चूल मांडून पक्षाला कितीही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही असे ही नांदेकर यावेळी म्हणाले.

पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांचेसह युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा, विधान सभा संपर्क प्रमुख संतोष माहुरे, संजय आवारी, रवी बोढेकर, चंद्रकांत घुघुल, डिमनताई टोंगे, नगराध्यक्ष रेखा मडावी, सुनील गेडाम, वनिता काळे, राजू ठेंगणे, सुनीता मस्की, अभय चौधरी, सुभाष बदकी यांच्या सह सेना व युवा सेनेचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.