ग्रामविकास अधिकारी विजय उईके यांची प्रशासकीय बदली रद्द करण्याची मागणी
बदली रद्द न झाल्यास आंदोलन व उपोषणाचा दिला इशारा
सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासीबहूल तालुका असून तालुक्यात ५५ ग्रामपंचायत आहेत. यापैकी २९ ग्रामपंचायत पेसा क्षेत्रामध्ये मोडतात. पेसा क्षेत्रात फक्त दोन ग्रामविकास अधिकारी आहेत. एकच अधिकारी हा आदिवासी समाजाचा आहे. फक्त एकटेच ग्राविकास अधिकारी विजय उईके हे पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. परंतु त्यांची बदली मारेगाव येथे झाली. त्यामुळे तालुक्यात एकही आदिवासी समाजाचा ग्रामविकास अधिकारी नाही.
ग्रामविकास अधिकारी विजय उईके यांच्याकडे माथार्जुन, दाभाडी या दोन पेसा ग्रामपंचायत व पाटण ग्रामपंचायतचा अतिरिक्त प्रभार आहे. तालुक्यात विविध विकासकामे करण्यात त्यांची प्रतिमा चांगली आहे. कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. उईके यांची प्रशासकीय बदली झाल्याने आदिवासी समाजावर अन्याय झाल्याचे निवेदनातून म्हटले आहे. मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्याना कोरोनाचा संसर्गामुळे स्थगिती देण्यात आल्या आहे. मग उईके यांच्या बदलीला का स्थगिती देण्यात येत नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊन उईके यांची नियुक्ती माथार्जुन याच ठिकाणी मुख्यालय कायम करावे. अन्यथा पंचायत समिती पेसा सरपंच संघटना व झरी आदिवासी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मुख्यकार्यकारी अधीकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. तसेच होणाऱ्या परिणामांस जवाबदार प्रशासन राहील. असा इशारा बाबूलाल किनाके, रमेश हललवार, सुभाष उईके, योगेश मडावी, गौरव नेटपेल्लीवार, नागोराव उरवते, सुनील कुमरे, राजकुमार कुडमेथे व प्रकाश सोयाम यांनी केला आहे.