क्रीडाप्रेमींचा एल्गार, चिमुकल्यांपासून वृद्धही उतरले रस्त्यावर

खेळापेक्षा पैसे महत्त्वाचे का? क्रीडाप्रेमींचा सवाल

0

विवेक तोटेवार, वणी: शासनाला अशा कार्यक्रमामुळे महसूल मिळतो. आता कार्यक्रमाला परवानगी दिली असल्याने यावर तोडगा काढणे कठिण आहे. आमदार साहेबांच्या या वक्तव्यांमुळे मैदानप्रेमी चांगलेच संतापले असून खेळापेक्षा पैसा मोठा झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मैदान हे खेळण्यासाठी असून पैसै कमविण्याचे साधन नाही. त्यामुळे मैदानावर कोणत्याही परिस्थित खासगी कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका मैदान प्रेमींनी घेतल्याने आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

येत्या नवरात्रीला एका खासगी संस्थेला दांडिया कार्यक्रमासाठी 10 दिवसांसाठी शासकीय मैदान दिले आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी, खेळाडू चांगलेच खवळले आहे. मैदान हे खेळण्यासाठी असून खासगी कार्यक्रमासाठी नाही अशी भूमिका घेऊन खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी याविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. गुरुवार सकाळी सुमारे 300 मैदानप्रेमी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी एकत्र आले. त्यानंतर रॅली काढण्यात आली.

या रॅलीत खेळाडू, पोलीस भरती सराव करणारे, फिरणारे यांच्यासह मैदानावर खेळणा-या चिमुकलेही सहभागी झाले होते. रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती. ही रॅली पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालयमार्गे आमदारांच्या घरी पोहोचली. तिथे प्रत्येक संघटनेच्या आणि गृपच्या प्रतिनिधींनी आमदारांची भेट घेतली व मैदानावरील कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केली. मात्र यावर लोकप्रतिनिधी काही ठोस भूमिका घेण्याऐवजी थातुरमातूर उत्तर दिल्याने क्रीडाप्रेमींचा राग अनावर झाला.

मैदान खेळण्यासाठी असते हे विसरले आमदार !
मैदान प्रकरणावर काहीतरी ठोस तोडगा निघेल यासाठी क्रीडाप्रेमी, खेळाडू यांनी आमदारांची भेट घेतली. मात्र त्यांनी आयोजकांनी पैसै दिले असल्याने आता परवानगी रद्द करणे कठिण असल्याचे सांगितले. तसेच अशा कार्यक्रमामुळे शासनाला महसूल मिळतो. या अगोदरही असे कार्यक्रम झाले आहे. असे स्पष्ट करत परवानगी रद्द करण्याची ठोस भूमिका घेण्याऐवजी मी प्रयत्न करतो अशी वेळकाढू भूमिका घेतल्याने क्रीडाप्रेमी चांगलेच संतापले. मैदान खेळण्यासाठी असते की पैसे कमवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित करत कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका मैदानप्रेमींनी घेतली आहे.

वणीमध्ये सध्या एकच योग्य परिस्थितीतील शासकीय मैदान आहे. या मैदानावर क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉल, ऍथलॅटिक, योगा इत्यादी खेळ प्रकार चालतात. शिवाय पोलीस भरती, सैन्य भरतीचा सरावही इथेच केला जातो. मैदानावर सकाळी आणि संध्याकाळी फिरण्या-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच अनेक सार्वजनिक कार्यक्रम, मूर्त्यांची विक्री, विविध सण इत्यादी गोष्टींसाठी या मैदानाची परवानगी देण्यात येते. दरम्यान यामुळे दोन ते तीन दिवस मैदानावरील खेळ, सराव सर्व बंद होतो. डिसेंबर महिन्यात पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन या परीक्षा आहेत. त्यामुळे त्यांचा सरावही थांबणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

निवेदन देते वेळी 11 स्टार क्रिकेट क्लब, युथ फुटबॉल असोसिएशन, हाण रट्टा व्हॉलीबॉल क्लब, संस्कार व्हॉलीबॉल क्लब, ब्लॅक डायमंड फुटबॉल क्लब, मॉर्निंग वॉक गृप, पोलीस भरती सराव गृप इत्यादी सहभागी झाले होते. या संघटनांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम होऊ देणार नाही, परवानगी नाकारली नाही तर आक्रमक भूमिका घेऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हे पण वाचा: शासकीय मैदानावरील कार्यक्रमाविरोधात क्रीडाप्रेमी आक्रमक)

Leave A Reply

Your email address will not be published.