ऐतिहासिक गुद्दलपेंडी जाणार विस्मरणात? यावर्षीही गुद्दलपेंडी नाही…

100 वर्षांपेक्षाही अधिकची गुद्दलपेंडीला परंपरा, मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनता

0
71

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रात केवळ एकाच ठिकाणी खेळला जाणारा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी. दरवर्षी धुळवडीला म्हणजे रंगपंचमीला वणीत हा अभूतपूर्व खेळ रंगतो. मात्र हा खेळ या वर्षी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे वणीच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचा तुरा रोवणारा हा खेळ विस्मरणात तर जाणार नाही? अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. स्पर्धेदरम्यान होणारी हुल्लडबाजी, लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाची उदासिनता यामुळे आयोजक यावर्षी हा खेळ घेण्यास अनुत्सुक असल्याचे बोलले जात आहे. राज्यभरात या खेळाची चर्चा असताना, तसेच हा खेळ जोपासणे गरजेचे असताना केवळ हुल्लडबाजीमुळे खेळ रद्द करण्याची वेळ येत असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमाला नेहमी प्रोत्साहन देणारे दानशूर काय करीत आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

वणी शहराला विदर्भाचं पुणं म्हटलं जातं. ते केवळ इथे असलेल्या सांस्कृतिक वारशामुळे. असाच एक वणीचा वारसा म्हणजे गुद्दलपेंडी. रंगपंचमीच्या रात्री गुद्दल पेंडी हा मैदानी खेळ खेळला जातो. या खेळाला 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असल्याचे बोलले जाते. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी वणी शहरातील सर्वात जुनी अशी नृसिंह व्यायाम शाळा ही शिवाजी व्यायाम शाळा यांच्या मदतीने या खेळाचे आयोजन करते. परंतु यावर्षी नृसिंह व्यायाम शाळेच्या पदाधिकारी-यांनी हा कार्यक्रम न घेण्याचे ठरवीले आहे.

यामागचे कारण पोलीस परवानगी नसल्याचे सांगण्यात आले असले तरी खेळामध्ये होणारी हुल्लडबाजी व त्यातून असणारी जोखीम यातून हा कार्यक्रम रद्द होत असल्याची माहिती आहे. शिवाय गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व खेळ प्रेमी हे देखील या खेळाबाबत उदासिन असल्याचे दिसून येते. मात्र सातत्याने या खेळाचे आयोजन रद्द होत असल्याने हा अभूतपूर्व खेळ काळाच्या ओघात लोप तर पावणार नाही अशी भीती कला व खेळ प्रेमींकडून व्यक्त होत आहे.

काय असते खेळाची रूपरेषा?
सकाळी 8 वाजता नृसिंह व्यायाम शाळेत व्यायामपटू व परिसरातील लोक एकत्र येऊन नाड्याची पूजा करतात. त्यानंतर वाजत गाजत या नाड्याची रॅली काढली जाते. रात्री ला 7 ते 10 वाजेच्या दरम्यान नियोजित ठिकाणी गुद्दलपेंडी रंगते. हा खेळ खुल्या मैदानामध्ये रंगतो. दोन खांबांना एक जाड दोरीच्या स्वरूपात नाडा बांधला जातो. या दोरीच्या दोन्ही बाजूला 10 ते 15 मल्ल उभे असतात. यात 10 वर्षांच्या चिमुकल्यांपासून 60 वर्षांपर्यंतच्या वयोवृद्धांचाही समावेश असतो. नाड्याला स्पर्ष करून मल्ल प्रतिस्पर्ध्याना ठोसे लगावण्यासाठी उभे ठाकतात. ठोस्याच्या माराने जो नाड्याचा स्पर्श सोडतो तो खेळाडू बाद होतो.

पिढ्यानं पिढ्या चालत आलेला हा खेळ नव्या पिढीला ज्ञात व्हावा किंवा शहराची सांस्कृतिक परंपरा टिकली पाहिजे या उद्देशातून नृसिंह व्यायाम शाळा व शिवाजी व्यायाम शाळा या संस्था प्रयत्नशील असतात. परंतु दर वर्षी खेळादरम्यान होणारी हुल्लडबाजी, लोकप्रतिनिधींची उदासिनता, सुरक्षेच्या दृष्टीने मिळणारे सहकार्य यामुळे अनेक वर्षापासून केवळ नावालाच ही सर्धा होत आहे.

रात्रभर चालणारा खेळ आला 10 मिनिटांवर
आधी हा खेळ रात्रभर चालायचा असे बोलले जाते. मात्र आता हा खेळ केवळ 10 मिनिटांवर आला आहे. आयोजक नावाला हा खेळ आयोजित करतात मात्र अपुरे व्यवस्थापन, हुल्लडबाजी, प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनता यामुळे हा खेळ केवळ 10 मिनिटे होतो व त्यानंतर हुल्लडबाजीचे कारण देऊन रद्द केला जातो. असे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार या खेळादरम्यान होत आहे. मात्र कित्येक वर्षांपासून कुणीही ही परंपरा टिकावी यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही.

गुद्दलपेंडीचे आकर्षण विदर्भात अनेकांना आहे. अनेकदा यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथून पत्रकार हा खेळ कव्हर करण्यासाठी येतात. शिवाय गाव खेड्यातून हा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक येतात. मात्र अपु-या नियोजनामुळे हा खेळ काही पूर्ण खेळला जात नाही किंवा प्रसंगी याचे आयोजनही रद्द केले जाते. जर योग्य असे नियोजन, हुल्लडबाजांना आवर, महिलांसाठी राखीव व्यवस्था इत्यादी सोयीसुविधा दिल्यास हा खेळ संपूर्ण देशभर पसरण्यास वेळ लागणार नाही. यासाठी केवळ लोकप्रतिनिधीनि तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीची गरज आहे.

जर या खेळाच्या आयोजनाकडे प्रशासनाने व आयोजकांनी लक्ष घातले तरच ही परंपरा कायम राहील अन्यथा ही परंपरा कायमची लोप लावेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Relief Physiotherapy clinic
Previous articleक्रिकेट सट्ट्यावर वणी पोलिसांची धाड, दोघांना अटक
Next articleप्रेम, विरह, कुटुंब याने नटलेली रोमॅन्टीक लव्ह स्टोरी तू झुटा मै मक्कार
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...