वणीत उत्साहात गुढीपाडवा साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवनेरी चौकातील रांगोळी ठरले आकर्षणाचे केंद्र

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले होते. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच सरकारने सर्व निर्बंध उठवल्याने शनिवारी गुढीपाडव्याचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. वणी शहरात ठीक ठिकाणी गुडी उभारून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.

गुढीपाडवा उत्सव समितीतर्फे येथील टिळक चौकातील शिवतीर्थावर गुढीपाडवा साजरा करण्यात आला. सणानिमित्त हा परिसर भगवी पताका, भगवा ध्वज तसेच रांगोळी टाकून सजवण्यात आला होता. नववर्षाचे स्वागत व गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यासाठी महिला संघटनेच्या अनेक महिला नववारी साडी व फेटा लावून शिवतीर्थावर पोहचल्या होत्या. याठिकाणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नितीन शिरभाते यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री रवी बेलूरकर, राजाभाऊ पाथर्डकर, प्रमोद निकुरे स्वराज्य युवा संघटनाचे अध्यक्ष अमर चौधरी, रविंद्र गौरकार, रविंद्र धुळे, अमीत उपाध्ये, सुरेंद्र नालमवार, विकेश पानघाटे, राहुल चौधरी इत्यादी उपस्थित होते. स्वराज्य युवा संघटनातर्फे गेल्या 10 वर्षांपासून गुढीपाडवा उत्सव मोठ्या हर्षोल्साहात साजरा करण्यात येतो. 

भव्य रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र
शिवनेरी चौकात वणीतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अश्विनी वऱ्हाडे व चंद्रपूर येथील प्रिया चव्हाण हिने 150 किलो रांगोळीचा वापर करून भव्य व देखणी रांगोळी काढली. या रांगोळीत सुमारे 15 पेक्षा अधिक शेड्सचा वापर करण्यात आला होता. ही भव्य रांगोळी तयार करण्यासाठी 4 तासांचा अवधी लागला. रांगोळी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक शिवनेरी चौकात पोहचले होते.

जैताई मंदिरात चैत्र नवरात्रास सुरूवात
शहरातील जैताई मंदिरात चैत्र नवरात्र महोत्सवास सुरवात झाली. पहिल्या दिवशी संध्याकाळी वर्धा येथील सुप्रसिध्द गायिका खुशबु कठाणे यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला वाद्यसंगत जीवन बांगडे (वर्धा) आणि अजित खंडारे (वणी) यांनी तबला व संवादिनीची साथ दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येन वणीकर नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

गुडीपाडवा समर सेल… सर्वोत्कृष्ट मानला जाणारा O General एसी आता वणीत

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुडीपाडवा स्पेशल ‘ठंडा ठंडा कुल कुल’ ऑफर

Comments are closed.