विवेक तोटेवार, वणी: सर्वसामान्यांची मुखाच्या कर्करोगापासून बचाव व्हावा यासाठी शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखुच्या विक्रीवर बंदी आणली आहे. यासाठी प्रशासनाने मिळणा-या कोट्यवधींच्या महसुलावरही पाणी फेरले. पारदर्शक कारभाराचे तुणतुणे वाजवणारे अधिकारी व खाकी साखऱ झोपेत असून तरुणाई धोक्यात येत असताना व महिन्याकाठी लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना कुठले कर्तव्य बजावत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वणीमध्ये मागणीनुसार एक किंवा दोन दिवस आड सुमारे 50 पेटी माल सुगंधी तंबाखूचा येतो. ही एक पेटी 22,500 रुपयांना विकली जाते. म्हणजे एका खेपेत सुमारे 11 लाखांचा माल वणीत उतरवला जातो. महिन्यातून 10 ते 12 खेप होते. त्यामुळे ही उलाढाल एक कोटीपेक्षा अधिक आहे. हा माल केवळ एकच तस्करांचा आहे.
दुस-या तस्कराचाही मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखु तसेच गुटखा वणीत येतो. मात्र या तस्कराचा नकली सुगंधी तंबाखुच्या विक्रीवर अधिक जोर आहे. या तस्कराचाही महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा गुटखा तसेच सुगंधी तंबाखू वणीत येतो. हे सर्व माल अवैधरित्या वणीत येत असल्याने शासनाला यातून जीएसटी किंवा इतर कोणताही कर मिळत नाही. त्यामुळे वर्षाकाठी फक्त वणी परिसरातूनच कोट्यवधी रुपयांचा कर बुडत असून शासनाला चुना लागत आहे.
तस्करांना शिवसेना ‘स्टाईल’ धडा शिकवणार – राजू तुराणकर
शिवसेनेने आधीपासूनच परिसरात अवैधरित्या विकल्या जाणा-या गुटखा, गांजा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हे व्यवसाय बंद व्हावे यासाठी शिवसेनेतर्फे शासन दरबारी निवेदन दिले आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला जात आहे. पण आता जर प्रशासनाला हे धंदे दिसत नसेल तर तस्करांना शिवसेना ‘स्टाईल’ धडा शिकवून हे अवैध धंदे बंद करेल. – राजू तुराणकर, शहर अध्यक्ष, शिवसेना
राजरोसपणे गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैधरित्या विक्री व तस्करीबाबत व्यापारी मंडळाच्या एका पदाधिका-याने अन्न व औषधी विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार देखील केली होती. मात्र खाकी व भ्रष्ट अधिका-यांचा डोक्यावर हात असल्याने हे तस्कर मस्तवाल झाले आहेत. कोणतीही भीती न बाळगता त्यांचे कार्य बिनबोभाटपणे सुरू आहे. याबाबत प्रशासनाने कार्यवाही न केल्यास याविरोधात मोठे आंदोलनही छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
कर्तव्यापेक्षा मलिद्याचा भार अधिक
परिसरात गुटखा व सुगंधी तंबाखू वितरणाचे वणी हे केंद्र आहे. प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु कुठून येतो? कसा येतो? कोण आणतो? कसा विकल्या जातो? याची इत्यंभूत माहिती अन्न व औषध प्रशासनाला आहे. मात्र याच्या तळाशी जाऊन मुळावर घाव घालण्याचे काम संबंधीत विभाग का करत नाही? कर्तव्यापेक्षा यातून मिळणा-या मलिद्याचा भार अधिक झाला? शिवाय नागरिकांचे आरोग्य वेशीला टांगणारे या विभागाचे अधिकारी स्वतःही पंगू झाले की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.