गुटखा तस्करीत मोठ्या माशांना अभय

'त्या' भ्रष्ट अधिका-यावर अद्याप कारवाई का नाही?

0

विवेक तोटेवार, वणी: गुटखा व सुंगधी तुंबाखूची तस्करी आणि साठवणूक करणारा जिल्ह्यातील सर्वात मोठा ‘सुपर स्टॉकिस्ट’ हा वणीचाच आहे. हा तस्कर गुटख्याची व सुगंधी तंबाखूची साठवणूक कुठे करतो? याची तस्करी कोणत्या प्रकारे होते? वितरण व्यवस्था कशी आहे? याची इस्तंभूत माहिती अन्न व औषधी तसेच पोलीस विभागाकडे आहे. मात्र अपु-या मनुष्यबळाचे कारण पुढे करून व कागदी घोडे नाचवून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. कधी कारवाई केली हे दाखवण्यासाठी एखाद्या छोट्या माशावर चुटुरफुटूर कारवाई केली जाते. मात्र यात जाणीवपूर्वक मोठ्या माशांकडे दुर्लक्ष केले जाताना दिसत आहे.

अधिका-यांना तपसणीची ‘तलब’ आली की ते वणीत डेरा टाकतात. तस्करांद्वारे अधिका-यांची त्यांच्या मनाला ‘पटेल’ अशी खातीरदारी केली जाते. वणीत चांगलीच ‘धमाल’ करून अधिकारी कोणतीही कारवाई न करता रिकाम्या हाताने परत जातो. या संपूर्ण प्रकरणात गुटखा व सुगंधी तंबाखू तस्करांकडून अधिका-यांची चांगलीच ‘मजा’ होत असल्याने सर्वसामान्यांना कर्करोगाचा विंचू ‘चावला’ तरी त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे. परिसरात तस्करीचा ‘दिपक’ उजळत असतानाच त्याला थेट  ‘सूर्या’चीच साथ मिळाल्याने त्याचा ‘प्रकाश’ आता चहूबाजूंनी पसरताना दिसतोय.

शहरात गुटखा गांधी चौक व’ जुना बसस्टँडमध्ये असणाऱ्या होलसेल व्यापाऱ्याकडे सहज उपलब्ध होतो. अगदी कोणत्याही पोलीस ठाण्याच्या बाहेर असणाऱ्या टपरीवर सहज व मुक्तपणे निर्भयपणे दिला जातो. मात्र, प्रथम बंदी आली तेव्हा फक्त ओळखीच्या ग्राहकांना गुटखा दिला जात होता. सध्या कारवाई होणार ही विक्रेत्यांची भीती नाहीशी झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अधिकारी येणार असल्याची खबर प्रथम ‘या’ होलसेल व्यापा-यांनाच दिली जाते.

सदर व्यापारी ही खबर सर्व किरकोळ विक्रेत्यांना सांगतात. सदर अधिकारी आल्यानंतर होलसेल व्यापाऱ्याच्या मर्जीनुसार किरकोळ दुकानदारावर कारवाई केली जाते, असे चित्र पाहावयास मिळत आहे. गुटख्याची छुपी उलाढाल जोमात सुरु आहे. या संबधी अंडरग्राऊंड मार्केट कार्यरत आहे.

हे पण वाचा: गुटखा, सुगंधी तंबाखू तस्करी व विक्रीची पाळंमुळं खोलवर

वणी उपविभागात किरकोळ विक्रेत्याची फळी तर होलसेल विके्रत्याची जाळे असल्यामुळे दिवसाढवळ्या गुटखा एकमेकांना सहज पोहचवला जातो. त्यातूनच दररोज लाखोची उलाढाल होते. वणी हे गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीचे मध्यवर्ती केंद्र आहे. इथून मारेगाव, झरी, पांढरकवडा, घाटंजी तालुका तसेच थेट वडकीपर्यंत गुटखा व सुगंधी तंबाखू पुरवला जातो. यासाठी गुटखा तस्करांनी खास यंत्रणा तयार केली असून, राजरोसपणे वाहतूक होताना दिसत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.