दिव्यांग सुनीलची मदतीसाठी याचना, चार वर्षांपासून पदरी निराशा

सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

0

निकेश जिलठे, वणी: एकीकडे सरकार दिव्यांगांना प्रतिष्ठा द्या म्हणते. त्यांना हक्काने जगण्यासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यास विविध योजना आणते. मात्र हे केवळ कागदोपत्रीच उरलेले आहे. वणीतील एक दिव्यांग तरुण गेल्या चार वर्षांपासून नगर पालिका प्रशासन व महसूल विभागाकडे सरकारी मदतीची याचना करीत आहे. मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करून ज्यावर त्याची उपजीविका सुरू आहे, तेच शेड तोडण्यात आले आहे. यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अखेर उद्विग्न मानसिकतेत त्याने सोशल मीडियात याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही कहाणी आहे सुनील चंद्रभान बदखल यांची. सुनील (35) हा भगतसिंग नगर, कनकवाडी येथील रहिवाशी आहे. तसा तो व्यवसायाने एक मूर्तीकार होता. कनकवाडी परिसरात डॉ. मुंजे यांच्या दवाखान्यासमोर एका शेडमध्ये तो मूर्ती तयार करायचा. मात्र त्यातच त्याला पॅरालिसिसचा झटका आला आणि यात त्याला अपंगत्व आले. अपंगत्वातून काही महिन्यांंनी सावरल्यावर सुनीलने त्याच जागेवर खाऊचे दुकान टाकले व त्याच्या जोडीला खेळण्यासाठी कॅरम लावला. यातून त्याच्या कुटुंबाची उपजीविका सुरू होती.

चार वर्षांआधी वणीमध्ये अतिक्रमण मोहिम रावबवण्यात आली. त्यात त्याचे दुकान तिथून उठवण्यात आले. मात्र जगण्याचा दुसरा कोणताही आधार नसल्याने त्याने त्याच जागेवर दुकान उभे केले. यात त्याला परिसरातील काही तरुणांनीही मदत केली. दरम्यान त्याने नगर परिषदेकडे 14 ऑगस्ट 2015, 16 जानेवारी 2017, 16 नोव्हेंबर 2017, 25 डिसेंबर 2017 रोजी निवेदन सादर करून जागा मिळण्याबाबत विनंती केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर त्याने 20 फेब्रुवारीला पुन्हा नगर परिषदेकडे जागेसाठी अर्ज केला मात्र त्यानंतर ही त्याच्या पदरी निराशा आली.

या जागेवर बगिचा बांधण्यासाठी अतिक्रमण काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शासनाने दिव्यांगांना आरक्षण देऊन त्यांच्या हक्कासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यात दिव्यांगांना व्यवसायासाठी दुकान, एसटीडी, पीसीओ, दूध विक्री केंद्र अशा व्यवसायासाठीची तरतुद केली आहे. नगर पालिकेला याबाबत जागा देण्याचे हक्क आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमीन वितरण नियम 1971 मधील 31 व्या तरतुदीनुसार दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा देण्याची तरतूद आहे. या तरतूदीनुसार जागा द्यावी अशी सुनीलची मागणी आहे. मात्र नगरपालिका प्रशासन आणि महसूल विभाग या दोन्ही विभागाने त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत त्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे.  अतिक्रमणात दुकान उठल्यानंतर याच जागेवर सुनील एका शेडमध्ये व्यवसाय करतो आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
प्रशासन लक्ष देत नाही. वारंवार निवेदन देऊनही नगर पालिकेने तर दुर्लक्ष केलंय सोबतच महसूल प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यावर दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. आज ना उद्या त्याचे दुकान तिथून हटवले जाणार. जर दुकान बंद झालं तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा? या यक्षप्रश्न त्याच्यासमोर आहे. अखेर खचून सुनीलने सोशल मीडियात याबाबत एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर होताच नगर पालिका व महसूल प्रशासनाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वणी बहुगुणीशी बोलताना सुनील म्हणाला की जागा अतिक्रमणाची आहे त्यामुळे मला हटण्यास कोणतीही समस्या नाही. मी एक दिव्यांग व्यक्ती आहे. घरची जबाबदारी माझ्यावर आहे. शासनाने दिव्यांगांसाठी अनेक सोयी सुविधा आणि आरक्षण दिले आहे. मी कायद्याबाहेर जाऊन कोणतीही मागणी केलेली नाही, कायद्यात राहूनच दिव्यांगांचा जो हक्क आणि अधिकार आहे त्याद्वारेच मी प्रशासनाकडे जागेची मागणी केली आहे. आज चार वर्ष अधिक झाले आहे मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही.

लिंकवर शेअर केलेला व्हिडीओ…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.