मांगुर्ला येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

गावक-यांनी वाजत गाजत काढली डॉक्टरांची मिरवणूक

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगुर्ला येथे शनिवारी दिनांक 20 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. दत्त मंदिरात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. यात रुग्णांची वैद्यकिय चाचणी, रक्त तपासणी तसेच रोग आणि लक्षणांनुसार तपासणी करण्यात आली. रोग ऩिदानानंतर रुग्णांना मोफत औषधींचे वाटपही करण्यात आले. 50 पेक्षा अधिक विविध वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ, पॅथॉलॉजिस्ट इत्यादींनी रुग्णांची तपासणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मांगुर्ला येथील दत्त मंदिरामध्ये दुपारी 1 वाजता या शिबिराला सुरूवात झाली. या शिबिरात स्त्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, बालरोग, अस्थीरोग, दंतरोग, नेत्ररोग, नाक कान घसा रोग, इत्यादी रोगांवर तपासणी व चाचणी करण्यात आली. सोबतच नेत्र आणि कानाच्या बहिरेपणावरही तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांवर केवळ औषधोपचाराचा खर्च घेऊन मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या शिबिराला मांगुर्ला (खु) मांगुर्ला (बु), दुर्गापूर, सालेभट्टी, पवनार, खडकडोह, अडकोली, इत्यादी गावातील रुग्णांनी तपासणी केली. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, डॉ. वीणा चवरडोल, सर्जरी तज्ज्ञ डॉ. अशोक कोठारी, डॉ. किशोर व्यवहारे, हृद्यरोग व मधुमेहासाठी डॉ. गणेश लिमजे, डॉ. अनिरुद्ध वैद्य, डॉ. दिलिप सावनेर, भूलतज्ज्ञ डॉ. शिरीष कुमरवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील जुमनाके, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. अमोल पदलमवार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रीती खाडे, डॉ. पल्लवी पदलमवार, नाक कान घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे, या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी आणि उपचार केले.

शिबिरानंतर गावक-यांनी केला ढोलताशांच्या गजरात जल्लोष
मागुर्ला हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. विकासाची गंगा या गावात कधी पोहोचलीच नाही तर आरोग्य सेवा तर दुरचीच गोष्ट होती. लोकांना कधीच तज्ज्ञांकडून आरोग्य सेवा मिळाली नाही. गावात पहिल्यांदाच आरोग्य शिबिर झाल्याने गावक-यांनी आनंदाने सर्व डॉक्टरांची वाजत गाजत मिरवणूक काढली. ढोलताशांच्या गजरात नाचत गावक-यांनी हा आरोग्योत्सव साजरा केला.

जल्लोष साजरा करताना गावकरी व डॉक्टरांची टीम

दत्तमंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. गावात दत्तजयंती नंतर कोणताही मोठा कार्यक्रम होत नव्हता. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दत्तजयंती नंतर हा पहिलाच कार्यक्रम झाल्याची माहिती दत्त मंदिरचे ट्रस्टी तुरंगे यांनी दिली. याआधी ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर सर्व रोगांवर उपचार करायचे. मात्र या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची पहिल्यांदाच त्या रोगांवरील तज्ज्ञांनी तपासणी केल्याचीही प्रतिक्रिया तुरंगे यांनी दिली.

गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार – डॉ. लोढा
शिबिरात अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे लक्षात आले. हे सर्व रुग्ण गरीब आहेत. त्यांना शस्त्रक्रियेचा खर्च झेपणारा नाही. त्यामुळे या सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. केवळ औषधीचा खर्चा व्यक्तिरिक्त इतर कोणताही खर्च त्यांच्याकडून घेतला जाणार नाही.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर मानकर, विशाल ठाकरे, अमोल ठाकरे, गजानन लकशेट्टीवार, संतोष बरडे, विशाल पारशीव, संदीप धवणे, अंकुश नेहारे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोढा हॉस्पिटल वणीची चमू यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.