विद्या निकेतन शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
संतोष ढुमणे, कायर: कायर येथील विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राथमिक आरोग्य केंद्र कायरचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत तेलसे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आशा पर्यवेक्षक माधुरी पारीलवार या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सरला ठावरी होत्या.
डॉ तेलसे यांनी उष्मांघात, अपघात, सर्पदंश व इतर अनेक आजारावर प्रथमोपचार कसे करायचे व प्रथमोपचार पेटीत आवश्यक साहित्य कोणते याबद्दल मार्गदर्शन केले. पारेलवार यांनी विद्यार्थ्यांना हात कसे धुवावेत याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले तसंच जंतूमुळे होणारे परिणाम यावर मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पिंपळकर यांनी केले तर आभार काशीनाथ आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.