निकेश जिलठे, वणी: गेल्या आठवड्यापासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. एप्रिलच्या मध्या पर्यंत 41 ते 42 डिग्री तापमान होते. मात्र अलिकडे तापमानाने 45 चा पल्ला गाठला आहे. तर येत्या रविवारी एप्रिल महिन्याचा तापमानातील उच्चांक गाठला जाणार आहे. या दिवशी तापमान 47 अंशावर जाणार आहे. या तापमान वाढीमुळे परिसरात उष्माघाताचा परिणाम दिसून येत असून अलिकडेच परिसरात दोन मृतदेह आढळून आले. या दोघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्णालयात उष्माघाताचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. अशातच या आठवड्याच्या अखेरीस तापमानात वाढ होणार असल्याने, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
रविवारी गाठणार तापमानाचा उच्चांक !
अक्युवेदर व इतर काही संस्थेच्या मते वणीत सोमवारी दुपारी 3.30 ते 4 दरम्यान कमाल तापमान 45 डीग्री से. राहणार. मंगळवारी, बुधवारी 44 डीग्री, गुरुवारी 43, शुक्रवार, शनिवारी 44 तर रविवारी तापमान उच्चांक गाठून पारा 47 डीग्रीला पोहोचणार आहे. सोमवार व मंगळवारी देखील उन्हाचा तडाखा कायम राहणार असून या दोन दिवस कमाल तापमान 46 डीग्री राहणार, असा अंदाज वातावरण विषयक माहिती देणा-या संस्थेने बांधला आहे.
आपला प्रदेश मैदानी आहे. या प्रदेशात सलग दोन किंवा त्या पेक्षा अधिक दिवस 40 डीग्री पेक्षा अधिक तापमान असल्यास त्याला उष्णतेची लाट म्हटले जाते. जर हेच तापमान सलग दोन पेक्षा अधिक दिवस 43 डीग्री पेक्षा अधिक असल्यास त्याला अती उष्ण लाट म्हणतात. सध्या 42 डीग्री वरून तापमानात अचानक 2 ते 5 डीग्री सेल्सीअसने वाढ झाल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर पडला आहे. रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णात अचानक वाढ झाली आहे. सध्या लग्नाचा सिजन आहे. त्यामुळे अनेकांना दुपारी घराबाहेर पडावे लागते. शेतकरी, अनेक मोल मजुरी करणारा कामगार वर्ग भर उन्हात काम करतात. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. हा उष्माघात जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे.
उष्माघात म्हणजे काय?
उष्माघाताची अशी स्पष्ट अशी कोणती व्याख्या नसली तरी कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्याच्या होणा-या गंभीर परिणामांना उष्माघात असे म्हटले जाते. त्याला सनट्रोक किंवा हिटस्ट्रोक असे देखील म्हटले जाते. बाहेरील तापमानामुळे, सतत उन्हात राहल्यामुळे किंवा श्रम, व्यायाम केल्याने जर शरीराचे तापमान 40 डीग्री पेक्षा अधिक झाल्यास त्या व्यक्तीला उष्माघात होतो. जर तापमान अधिक वाढल्यास व वेळीच उपचार न मिळाल्यास उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. अशी माहिती लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.
उष्माघाताचे प्रकार किती?
उष्माघात दोन पद्धतीचा असतो. यातील एक श्रमाशी तर दुसरा उन्हाशी संबधीत आहे. शेतकरी, मजूर, खेळाडू किंवा उन्हात अंगमेहनतीचे काम करणा-या व्यक्तीला श्रम संबंधीत (Exertional Heat Stroke) उष्माघात होतो. तर अधिक वेळ उन्हात किंवा उष्ण वातावरणात राहिल्यास अश्रम (Non-exertional Heat Stroke) उष्माघात होतो. लहाण मुले, वृद्ध व्यक्ती किंवा अधिक वेळ उन्हात फिरल्याने किंवा उष्णता असलेल्या वातावरणात, घरात असलेल्या व्यक्तींना या प्रकारचा उष्माघात होतो. याशिवाय हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, मधुमेह, लठ्ठपणा असलेले लोक तसेच गंभीर आजार असणा-या व्यक्तींना उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो, अशी माहिती वणीतील जाधव क्लिनिकचे संचालक व सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांनी दिली.
उष्माघाताची लक्षणे काय आहेत?
चक्कर येणे, मळमळ होणे, उलटी येणे, पोटात कळ येणे, शरीरातील पाणी कमी होणे, डोकेदुखी, थकवा, सतत झोप येणे ही उष्माघाताची लक्षण आहेत. याशिवाय लघवीचा रंग गडद पिवळा होणे, हृद्याचे ठोके वाढणे, बेशुद्धी येणे, हातापायाला मुंग्या किंवा झटके येणे, भान हरपणे, गुंगीत जाणे इत्यादी उष्माघाताचे लक्षणं आहेत. उष्माघात झाल्यास तातडीने डॉक्टरांना भेटावे. अशी माहिती डॉ. आशुषोष जाधव यांनी दिली.
सावधान ! व-हाडी व मद्यपींना अधिक धोका…!
सध्या लग्नाचा सिजन असल्याने भर उन्हात वरात निघते. यात अनेक लोक नाचतात. भर उन्हात राहिल्याने शरीरातील पाणी कमी होते. अनेक लोक यात योग्य ती काळजी न घेता नाचतात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन व शरीराचे तापमान वाढल्याने व-हाड्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. अनेक लोक भर दुपारी मद्यपान करतात. मद्य हे शरीरातील पाणी कमी करते. त्यामुळे दुपारी मद्यपान करू नये. अनेक लोक मद्य प्राशन करुन वरातीत नाचतात. अशा व्यक्तींना उष्माघाताचा धोका असतो. शेतकरी व मजूर वर्ग भर दुपारी उन्हात काम करतो. मात्र सध्या काही काळ त्यांनी भर दुपारी उन्हात कष्टाचे काम करणे टाळावे.
उष्माघात कसा टाळावा?
या संदर्भात डॉ. महेंद्र लोढा यांनी माहिती दिली की बाहेरील तापमान वाढले की शरीराचे तापमान वाढते. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक असतो. त्यामुळे यावेळी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, तसेच बाहेर जाताना सुती कपडे वापरावे, स्कार्फ, टोपी किंवा रुमाल बांधून घराबाहेर पडावे. उष्माघात टाळण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे, दर तीन ते चार तासांनी लघवी यायला हवी, तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे. ओआरएस, लिंबू शरबत, ताक, तांदळाची पेज, फळांचा रस इत्यादी पेय पिणे, तसेच टरबूज, खरबूज इत्यादी फळ अधिकाधिक खाणे शरिराला फायदेशीर असते. तसेच पचायला जड पदार्थ टाळावेत. तसेच सॉफ्ट ड्रिंक (कार्बोनेटेड कोल्ड्रिंक) चहा, कॉफी, मद्य याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात, अशी माहिती डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.
Comments are closed.