वीज पुरवठा सुरळीत करताना कामगाराला विजेचा जबर धक्का

कामगाराचा जागीच मृत्यू, वणीतील एमआयडीसी परिसरातील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या एका कामगाराचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वणीतील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. अतुल भाऊराव कोसारकर असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

अतुल भाउराव कोसारकर (30) हा तरुण मोहुर्ली येथील रहिवासी होता. तो वीज वितरण कंपनीसाठी काम करणा-या एका कंत्राटदाराकडे काम करायचा. शनिवारी संध्याकाळी परिसरात वादळ आल्याने झाडं विजेच्या तारांवर उन्मळून पडले. अनेक पोल वाकलेत. त्यामुळे परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला. मात्र पहाटे काही परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला तरी काही ठिकाणी मात्र विज पुरवठा ठंडीतच होता.

एमआयडीसी परिसरात अनेक पोलवर झाडं तसेच झाडाच्या फांद्या कोसळल्या होत्या. त्याच्या कटाईचे काम रविवार सकाळपासूनच सुरु होते. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास झाडाच्या कटाईचे काम करण्यासाठी अतुल हा त्याच्या सहका-यासह खांबावर चढला होता. मात्र दरम्यान त्याला विजेचा जबर धक्का बसला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अतुलच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अतुलच्या पश्चात पत्नी, दोन मुलं व आप्त परिवार आहे. या अपघातामुळे विज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त होत आहे.

रविवारी गाठणार तापमानाचा उच्चांक, परिसरात वाढले उष्माघाताचे रुग्ण

Comments are closed.