‘कोविड केअरलेस सेन्टर’, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

आजारापेक्षा उपचार जालीम, संशयीत संतप्त

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा विळखा दिवसंदिवस घट्ट होत असताना त्यातच आता वणी येथील कोविड केअर सेंटरच्या संस्थात्मक विलगिकरण कक्षात अस्वच्छता आणि घाणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत कॉरन्टाईन असलेल्या व्यक्तींनी तिथल्या अस्वच्छतेबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे प्रशासनाचा गलथानपणा समोर आला आहे. तसेच एक ऑडिओही व्हायरल होत आहे ज्यात लोकप्रतिनिधी आरोग्य विभागाला संपर्क साधा असे सांगत जबाबदारी झटकताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम करत आहे, परिणामी सर्वसामान्यांनी आता दाद मागावी तरी कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कॉरन्टाईन असलेल्या व्यक्तींनी कोविड केअर सेन्टरचे मोबाईलद्वारा चित्रीकरण केले आहे. एका व्हिडीओत एक स्विपर रूम बाहेर झाडू मारतोय. त्यात एक व्यक्ती त्यांना येऊन झाडू आत का मारीत नाही याबाबत विचारण करतोय तर तो त्यावर नाही असे उत्तर देतो. इतर व्हिडीओमध्ये शौचालय, बाथरूम व मुत्रीघर दाखवण्यात आले आहे. त्यात तिथली परिस्थिती अतिशय विदारक दिसत आहे. साफसफाईन न झाल्याने तिथे पाणी साचले आहेत तसेच सफाई न झाल्याने अतिशय घाण अवस्थेत इथले बाथरूम, शौचालय व मुत्रीघर असल्याचे दिसून येत आहे.

वणी तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 24 पॉजीटिव्ह रुग्ण सापडले असून त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्तींना वणी-यवतमाळ मार्गावर असलेले परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगिकरण कक्षात दाखल केले जाते. इथूनच तपासणीसाठी स्वॅब घेतले जाते व ते यवतमाळला तपासणीसाठी पाठवले जाते. कोविड सेंटरच्या तळ मजला व पहिल्या मजल्यावर कॉरंटाईन करण्यात आलेले महिला व पुरुष यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोरोना चाचणीत पोजीटिव्ह पण लक्षणं नसलेल्या रुग्णांना दुसऱ्या माळ्यावर ठेवण्यात आलेले आहे.

सद्य स्थितीत केंद्रात 40 व्यक्ती क्वारंटाईन आहेत तर 5 पोजिटिव्ह आलेले व्यक्ती इथेच आहेत. याआधीही परसोडा येथील कोविड केअर केंद्रात दाखल व्यक्तींना देण्यात येणारे जेवण निकृष्ठ असल्याचा व त्यातील पोळी अर्धीकच्ची राहत असल्याच्या तसेच इथे असलेल्या स्वच्छतेबाबत अऩेक तक्रारी आल्या होत्या. प्रशासनाने जेवण पुरविणा-या संबंधित कंत्राटदाराला तंबी देऊन चांगल्या दर्जाचे जेवण देण्यास भाग पाडले. मात्र साफ सफाईची समस्या अजून कायम असल्याची ओरड क्वारंटाईन असलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

व्हिड़ीओ आल्यानंतर फॅक्टचेकसाठी ‘वणी बहुगुणी’ने कोविड केअर सेन्टरमध्ये कॉरन्टाईन असणा-या काही व्यक्तींशी संपर्क साधला असता त्यांनी पोळी अध्येमध्ये कच्ची असली तरी जेवणाबाबत तक्रार नसल्याचे सांगितले. पण स्वच्छतेबाबत मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषत: त्यांची शौचालय व बाथरूमच्या स्वच्छतेबाबत तक्रार आहे. बाथरुम म शौचालय हे रोज वापरायची जागा आहे. मात्र इथल्या अस्वच्छतेमुळे हे ठिकाण भीतीदायक वाटत असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली. दरम्यान शुक्रवारी साफसफाई झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

अधिका-यांना एक दिवस राहून दाखवण्याचे चॅलेन्ज
व्हि़डीओ शेअर करणा-या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही छोटे मुलं घेऊन आलो आहोत. आम्हाला आमची काळजी नाही पण आमच्या छोट्या मुलांची काळजी आहे. मात्र इथल्या अस्वच्छतेमुळे मुलं शौचास जाण्यास टाळत आहे. प्रशासनाकडे तक्रार केली पण ते दुर्लक्ष करतात. कोविड केअर सेन्टरमध्ये जर अस्वच्छता नसेल तर प्रशासनाच्या एखाद्या तरी अधिका-यांनी तिथे एक दिवस राहून दाखवावे व गैरसमज दूर करावा.
– कॉरन्टाईन असलेली व्यक्ती

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणे, कोविड केअर केंद्राची व्यवस्था व कंटेन्मेंट झोन देखरेखीसाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य, पोलीस विभाग व नगर परिषद अधिकारी यांची संयुक्त समितीचे गठन करण्यात आलेले आहे. मात्र कोविड केंद्रातील अव्यवस्थेसाठी सर्व विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी म्हणते की आमच्याकडे मनुष्यबळ अपुरा असून नगर परिषद सहकार्य करीत नाही. तर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी आरोग्य विभागाला जवाबदार ठरविले आहे. उप विभागीय अधिकाऱ्यांचे मते वणी तालुक्यात सर्व “ऑल इज वेल” आहे.

कोरोना प्रतिबंध आणि उपाय योजनेसाठी शासनाकडून तालुका स्तरावर लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असताना नेमकी निधी खर्च कुठे होत आहे ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

नगरपालिकेने कर्मचारी उपलब्ध करून द्यावे – डॉ. देठे
परसोडा येथील कोविड केंद्रातील साफ सफाई साठी रोजंदारी तत्वावर 4 कर्मचारी नेमण्यात आलेले आहे. मात्र कोरोना विषाणू लागण होण्याच्या भीतीने कर्मचारी क्वारंटाईन कक्षात साफ सफाई करण्यास घाबरतात. नगर परिषदने सफाई कर्मचारी उपलब्ध करून दिल्यास बाथरूम व शौचालय स्वच्छतेची समस्या राहणार नाही. नगर परिषद जवळ सॅनिटायझर यंत्र असताना त्यांनी कक्षासाठी दिला नाही. नगर परिषद सहकार्यच्या भूमिकेत नाही.
-अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी, वणी

आरोग्य विभागाचा निधी कुठे गेला? – मुख्याधिकारी
वणी शहरात कंटेन्मेंट क्षेत्र होण्यापूर्वी कोविड केंद्रावर नगर परिषदचे कर्मचारी काम करीत होते. आम्ही चारशे रुपये रोजंदारीवर ठेवलेले सफाई कर्मचारी आरोग्य विभागाने काढून टाकले व त्यांचा अर्धा पगारसुद्दा दिला नाही. नगर परिषदचे 17 कर्मचारी सद्या शहरातील कंटेन्मेंट क्षेत्रात कामात गुंतून आहे. आरोग्य विभागाला 15 लाखाची निधी शासनाकडून मिळूनही जर कोविड केंद्रात साफ सफाई होत नसेल तर निधीचा नेमका उपयोग कुठे होत आहे ? आरोग्य अधिकाऱ्यांनी कळविल्यास आम्ही आताही कर्मचारी व सॅनिटायझर फवारणी पंप उपलब्ध करून देण्यास तयार आहोत.
– संदीप बोरकर : मुख्याधिकारी न.प. वणी

ऑल इज वेल – डॉ. जावळे
परसोडा येथील कोविड केंद्रातील संस्थात्मक विलगिकरण कक्षात कोणत्याही प्रकारची समस्या नाही. प्रशासनाचे सतत लक्ष आहे. केंद्रात दाखल व्यक्ती तिथून लवकर सुट्टी करण्याच्या आग्रह धरून जाणून बुजून असे व्हिडीओ व्हायरल करतात. पूर्वी काही समस्या होत्या, मात्र आता “ऑल इज वेल” आहे.
– डॉ. शरद जावळे, उप विभागीय अधिकारी, वणी

कोविड केअर सेन्टरमध्ये आरोग्य, महसूल, नगरपालिका प्रशासनाला समन्वय साधून कार्य करायचे आहे. मात्र इथे कुणाचा कुणाला ताळमेळ नसताना दिसत आहे. जो तो आपली जबाबदारी दुसर-यावर धकलताना दिसत आहे. परिणामी कॉरन्टाईन झालेल्या व्यक्तींमध्ये कॉरन्टाईन सेन्टरबाबत एक दहशत निर्माण होत आहे. व्हायरल झालेले व्हि़डीओ आणि तेथील व्यक्ती जे काही आरोप करीत आहेत ते जर खरे खरे असेल तर हा कॉरन्टाईन व्यक्तींच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असेच म्हणावे लागेल.

लिंकवर व्हायरल झालेला व्हिडीओ व ऑडिओ….

 

Leave A Reply

Your email address will not be published.