दुपारी मुसळधार पावसाने वणीकरांना झोडपले

वादळी वा-यासह शहरात तुफान पाऊस

जितेंद्र कोठारी, वणी: दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वणीकरांना चांगलेच झोडपून काढले. आज सकाळपासून ऊन तापत असताना दुपारी 12.30 वाजता दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आले. काही वेळाने जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास तास भर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचले. दरम्यान शहराचा वीजपुरवठाही काही काळासाठी खंडित झाला.

वणी तालुक्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सततच्या पावसामुळे नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहे. वर्धा नदीत आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील गावात अतोनात नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीनचे उभे पिके पाण्याखाली बुडाले. मागील 2 दिवसापासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने शेतकरी मशागतीच्या कामाला लागले होते. परंतु शुक्रवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली.

अचानक आलेल्या पावसाने उडाली तारांबळ
आज सकाळी वातावरणात उघाड होता. त्यामुळे पावसाचा नागरिकांना अंदाज आला नाही. ग्रामीण भागातीलही अनेक लोक खरेदी व इतर कामांसाठी वणीत येतात. दुपारी अचानक शहरात वादळी वा-यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान अनेकांनी कॅन्टिन तसेच इतर ठिकाणी आसरा घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.