वणीत रविवारी संध्याकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग
सं. 6 ते 8 पावसाची संततधार, रात्रभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता
जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान शहरात धुवाधार पाऊस झाला. लॉकडाऊन असल्याने शहरातील बाजारपेठ बंदच होती मात्र कामानिमित्त वणीत आलेल्यांची तसेच संध्याकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या व्यक्तींची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. रात्री उशिराही पावसाची रिपरिप सुरुच होती. हा पाऊस रात्रभर सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज रविवारी दिनांक 18 जुलै रोजी सकाळपासून शहरात वातावरण कोरडे होते. दुपारी कडक उन्ह पडले. मात्र सूर्य मावळतानाच 5 वाजताच्या दरम्यान अचानक आकाशात काळे ढग दाटले व पाऊस सुरू झाला. संध्याकाळी 6 नंतर पावसाने चांगलाच जोर पकडला. हा धुवाधार पाऊस रात्री 8 पर्यंत सुरुच होता. त्यानंतरही पावसाने येणे जाणे सुरूच होते.
शहरात धुवाधार तर तालुक्यात तुरळक पाऊस
वणी शहरात जरी जोरदार पाऊस असला तरी ग्रामीण भागात मात्र कमी प्रमाणात पाऊस पडला. शिरपूर मोहदा परिसरात संध्याकाळी तुरळक पाऊस पडला. तर भालर, बेसा, लाठी येथे 8 वाजताच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी आल्या. वृत्त लिहे पर्यंतही (रात्री 10 वाजता) शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती. हा पाऊस रात्रभर राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा: