जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसापासून आकाशात काळे ढग दाटून येत होते. पण पाऊस होत नव्हता. शहरात आज गुरुवारी दिनांक 10 जून रोजी दुपारी 11 वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी दोन नंतर पावसाने जोर पकडला व सुमारे एक तास शहरात दमदार पाऊस झाला. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरुच होती. तालुक्यातील ग्रामीण भागातही हीच परिस्थिती होती. ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाला. मृगाच्या या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान कृषी विभागाने 100 मीली पाऊस होत पर्यंत पेरणी करू नये असे आवाहन केले आहे.
खरीप पेरणीसाठी तालुक्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी आतुरतेनं पावसाची प्रतिक्षा करीत होते. आज समाधानकारक पाऊस झाल्यास शेतकरी पेरणी कामाला लागणार आहे. मृगनक्षत्रापासूनच पावसाळ्याला प्रारंभ होत असल्याने हे नक्षत्र लागण्याच्या आधीपासूनच शेतकरी मशागतीच्या कामे करून ठेवतो. पुरेसा पाऊस झाला की शेतकरी पेरणीच्या कामाला लागतो.
खरीप हंगामात वणी तालुक्यातील 162 गावातील 62423 हेक्टर शेतजमीनपैकी सरासरी 60 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाणार आहे. त्यात 45 हजार हेक्टर कापूस, 8 हजार हेक्टरवर सोयाबीन व 7 हजार हेक्टर क्षेत्रात तूर व इतर धान्याची पेरणीचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये: सुशांत माने
गुरुवारी तालुक्यातील सर्व गावात चांगला पाऊस पडल्याची माहिती आहे. मात्र शेतजमीन तापलेली असल्यामुळे 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावे. कमी पावसात पेरणी केल्यास दुबार पेरणीची पाळी येऊ नये. तालुक्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.
सुशांत माने: तालुका कृषी अधिकारी, वणी
कृषी क्षेत्रामध्ये मृग नक्षत्राला मोठे महत्त्व आहे. पावसाळ्यातील हे पहिले आणि मोठे नक्षत्र म्हणून याकडे पाहिले जाते. या नक्षत्रात पेरणी झाली तर हंगाम चांगला येतो. त्यामुळे या नक्षत्रात शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा असते. मंगळवार 8 जून पासून मृग नक्षत्र सुरू झाले असून, शेतकऱ्यांना या नक्षत्रात मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे गुरुवारी दुपारीपासून वणी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.
हे ही वाचा: