विलास ताजने, वणी: शुक्रवारी सकाळी मेंढोली, बोरगाव, पिंपरी गावशिवारात मुसळधार पाऊस पडला. परिणामी सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे एक-सव्वा तास पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शिवारातून पाणी ओसंडून वाहत होते. ओढ्यांना पूर आला होता. परिणामी सोयाबीन, कापूस पिकांची हानी झाली आहे.
वणी तालुक्यातील मेंढोली, पिंपरी, बोरगाव आदी गावशिवारात (दि.9) शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु झाला. एक ते सव्वा-तास पडलेल्या पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. या मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. सध्या कापूस फुटलेला आहे. कापसाची वेचणी सुरू आहे. काही शेतात मजुरांअभावी वेचणी खोळंबली आहे.
सोयाबीन पिकांची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने पिकांची नासधूस होत आहे. झाडांवरील कापूस ओला झाला आहे. ओला झालेला कापूस खाली पडत आहे. कापलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहे. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. हाती आलेले पिकं नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करावी, अशी मागणी विवेक मुके, दीपक बलकी, विनायक ढवस, योगेश ताजने आदी शेतकऱ्यांनी मागणी आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)