सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी 5 वाजेपासून पावसाने हजेरी लावली असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने पैनगंगा नदीसह नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन नदीनाले दुथळे भरून वाहत आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची हाणी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट बघत असणारा शेतकरी या पावसाने चांगलाच सुखावला आहे.
शासनाकडून 8 जुलै पर्यंत अतीवृष्टीचा धोका असल्याची सूचना केली आहे. याची माहिती महसूल विभागाच्या तलाठ्याद्वारे प्रत्येक गावात देण्यात आली आहे. तालुक्यातील खातेरा, पिंपरड, राजूर, मांगली, पाटण, हे गावे नदीकाठाजवळील असून या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील दिग्रस, धानोरा, व दुर्भा ह्या तीन गावना सर्वात मोठा पुराचा धोका असून हे तीनही गावे पैगंगेच्या किनाऱ्याजवळ वसलेले आहे.
यापूर्वी या गावांना पुराने प्रभावित केले होते. त्यामुळे गावातील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अद्याप तालुक्यात कोणत्याही नदी नाल्यांना पूर आला नसून कोणत्याही ठिकाणी नुकसान झाले नसल्याचे माहिती तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.