चांगल्या खरीप पिकांचा केला परतीच्या पावसाने सत्यानास

हातातोंडाशी आलेल्या पिकांचे झाले मातेरं, शेतकरी हवालदिल

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिरपूर, शिंदोला, कुरई, कायर, घोन्सा, नांदेपरा, राजूर, पुनवट, सावर्ला यासह तालुक्यातील बहुतांश भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. परिणामी काढणीस आलेल्या खरीप पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. हातातोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल होताना पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता जगायचं कसं ? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

वणी तालुक्यात पंधरवड्यापूर्वी उत्तरा नक्षत्रात जोरदार पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, कापूस पिकांची काढणी रखडली होती. दरम्यान कापूस, सोयाबीन पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, हस्त नक्षत्राच्या अखेरीस पावसाने उसंत घेतल्याने सोयाबीन काढणी आणि कापूस वेचणीला वेग आला होता. आठवड्याभरात तीस ते चाळीस टक्के लोकांची सोयाबीन काढणी उरकली. तथापि, मजुरांअभावी कापूस वेचणी मंद गतीने सुरू होती. फक्त वीस टक्के लोकांची पहिली कापूस वेचणी उरकली.

सध्या शिवारात शेतमाल काढणीची लगबग सुरू होती. मात्र, शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. शेतातील सोयाबीनच्या गंज्या भिजल्या. शेतात वाळू टाकलेले सोयाबीन ओले झाले. कापसाच्या झाडांवरील भिजलेला कापूस लोंबून जमिनीवर पडत आहे. सततच्या पावसाने कापसाची प्रत खालावत आहे. हवामान खात्याने पुन्हा दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

अतिवृष्टीमुळे कापसाची नासाडी होत आहे. वेचणी केलेला कापूस घरात कुलर, पंखा लावून सुकवला जात आहेत. खासगी व्यापारी ओलाव्याच्या नावाखाली अल्पदरात कापूस, सोयाबीनची खरेदी करीत आहेत. खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट केली जात आहेत. मात्र, मजुरांची मजुरी देणे, हात उसनवारी देणे, सण साजरा करणे, मुलांचे शिक्षण यासह दैनंदिन घर खर्चासाठी पैशांची गरज असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना मालाची विक्री करावी लागते.

व्यापारी शेतकऱ्यांच्या मजबूरीचा गैरफायदा घेत अक्षरशः लूट करीत आहेत. गत दोन वर्षातील हंगामात कापूस पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आला होता. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. मात्र, यंदा कापूस पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्यातरी अल्पसा दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्नाची आशा होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतातील हातातोंडाशी आलेल्या कापूस, सोयाबीन पिकांची पावसामुळे झालेली वाईट अवस्था पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत. हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

हेदेखील वाचा:

थोडक्यात महत्त्वाच्या क्राईम अपडेट

चपलेने केला घात, घट विसर्जन करताना इसम गेला वाहून

Comments are closed.