जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या पंधरा दिवसापासून चातक पक्ष्यांप्रमाणे पावसाची वाट बघत असलेल्या वणीकरांची शुक्रवार पहाट उजाडली ती धुवांधार पावसाने. गुरुवारी मध्यरात्री पासून संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारी दिवसभर कायम असून वणीच्या जीवनदायिनी निर्गुडा नदीसह अनेक नदीनाळे तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. या पावसाने सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली असता पावसाने वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून पाठ फिरवल्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते तर भूगर्भात पाण्याची पातळी खोल झाल्यामुळे वणीकर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री पासून तर शुक्रवारी दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार येत्या दोन तीन दिवस विदर्भात पावसाचे जोर कायम राहणार आहे.
शेतांचे झाले शेततळे
१२ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून शेतांना शेततळयाचे स्वरूप आल्याचे शिरपूर, वेलाबाई, कायर, पुरड, मोहदा, व ग्रामीण भागात पहावयास मिळाले आहे.
पाऊस आला… वीज गायब
अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे वणीकर जनता सुखावली आहे मात्र पाऊस येताच ग्रामीण भागाप्रमाणे शहराचे वीज पुरवठा खंडित करण्याच्या वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. वाराधुंद नसताना तुरळक पावसामध्ये शहरातील अनेक भागामध्ये गुरुवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाला तो शुक्रवारी दुपारी पर्यंत सुरु करण्यात आला नव्हता.